‘स्लमडॉग मिलिऑनेर’च्या अभूतपूर्व यशामुळे भारतीय ‘मॉडेल’पदावरून आंतरराष्ट्रीय अभिनेत्रीचा पल्ला गाठत ‘डॉलर’, ‘पौंडाच्या’ हिशेबात चित्रपट निवडणाऱ्या फ्रीडा पिंटोला आता भारतीय चित्रसृष्टीचे वेध लागले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीमधील भूमिका करण्यासाठी आपण योग्य नसल्याचे म्हणणारी फ्रिडा पिंटो आता चक्क भारतीय सिनेमा आपल्याला रुचत असल्याचे म्हणू लागली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला मी कधीच वेगळे टाकले नव्हते, मात्र पूर्वी भारतीय चित्रपट माझ्या प्रतिमेशी जुळणारे नव्हते. आता बदलत चाललेल्या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला आवडेल, असे पिंटो हिने जाहीर केले आहे.
म्हणते काय?
भारतीय चित्रपट हा वाईट असल्याची टीका मी कधीही केलेली नाही. मला भारतीय चित्रपटही आवडतात. मात्र भारतीय चित्रपटाच्या वैशिष्टय़पूर्ण असलेल्या साच्याशी मी कधीच मिळती जुळती नव्हते. ‘पान सिंग तोमार’, ‘शहीद’, आणि ‘गट्टू’ यांसारख्या चित्रपटांमुळे भारतीय सिनेमा बदलाच्या वाटेवर आहे. त्यामुळे मी यासारख्या चित्रपटांमध्ये नक्कीच बसू शकते, असे फ्रिडा पिंटो हिने शुक्रवारी एका कार्यक्रमामध्ये स्पष्ट केले.

जुने काय?
स्लमडॉग मिलिऑनेर या २०१० सालातील ऑस्कर व इतर सारे महत्त्वाचे पुरस्कार पटकावणाऱ्या चित्रपटात प्रमुख अभिनेत्री असलेली फ्रिडा पिंटो हिला रातोरात स्टारपद प्राप्त झाले. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक-अभिनेते वुडी अ‍ॅलन यांच्या ‘यू विल मीट ए टॉल डार्क स्ट्रेन्जर’ चित्रपटामध्ये तसेच ‘राईझ ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स’, ‘त्रिश्ना’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये तिला प्रमुख भूमिका मिळाल्या. हे चित्रपट आपटल्यानंतर मात्र हॉलीवूडमध्ये तिच्या नावाची चर्चा उत्तरोत्तर ओसरू लागली.

नवे काय?
प्रत्येकाकडे आपले क्षेत्र निवडण्याबाबत दोन पर्याय असतात. मी जर अभिनेत्री झाले नसते, तर लग्न समारंभाचे नियोजन करण्याचा ( ‘वेडिंग प्लानर’) पर्याय निवडला असता, असे फ्रिडा पिंटो म्हणाली. हॉलीवूड आणि ब्रिटनमध्ये चित्रपट मिळविताना वांशिक भेदाशी सामना करावा लागला. केवळ भारतीय वंशाची असल्यामुळे मला भूमिका मिळाली असल्याचे माझ्या ‘रोल एजंट’ने सांगितल्याचे तिने स्पष्ट केले. मला वांशिक भेद दाखविणारी अभिनेत्री म्हणून काम करायचे नव्हते. मात्र चित्रपटात भारतीय मुलीचे काम करताना आनंद झाल्याचे तिने मान्य केले.

परिस्थिती काय?
 स्टीवन स्पीलबर्ग यांच्यासारखे हॉलीवूडमधील दिग्गज दिग्दर्शक तसेच विविध अभिनेते-अभिनेत्री भारत आणि भारतीय चित्रपटांचे कौतुक करीत असताना, भारतीय कलाकार आंतरराष्ट्रीय चित्रप्रकल्पांमध्ये सहभागी होत असताना, केवळ हॉलीवूडमध्ये रमत रमत ‘दमलेल्या’ फ्रिडा पिंटोला बॉलीवूडमध्ये नवी कर्मभूमी दिसावी, यात मोठे नवल नसले, तरी आगामी काळात ती भारतीय चित्रपटांमध्ये कोणते ‘आंतरराष्ट्रीय कसब’ दाखविते, हे कुतुहलाचे असेल.

Story img Loader