पाकिस्तानी आणि भारतीय सिनेमा यांच्यामध्ये नेहमीच मोठी स्पर्धा सुरु असते. पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट आणि मालिकांना नेहमी पसंती मिळते. तसेच भारतात देखील पाकिस्तानी चित्रपट आणि मालिका पाहिल्या जातात. पण सध्या एक हिंदी मालिका ही पाकिस्तानी मालिकेची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानी मालिका ‘मेरे पास तुम हो’ ही अतिशय लोकप्रिय ठरली होती. या मालिकेची कथा सोनी वाहिनीवर सुरु होणारी नवी मालिका ‘कामना’मध्ये कॉपी केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या भारतीय मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून ही पाकिस्तानी मालिकेची कॉपी केल्याचे नेटकऱ्यांनी म्हणत खिल्ली उडवली आहे.
आणखी वाचा : शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांनीच माझ्यासोबत…; ‘गोपी बहू’ने केला धक्कादायक खुलासा

पाकिस्तानी मालिका ‘मेरे पास तुम’मध्ये एक मध्यम वर्गीय कुटुंबांची कथा दाखवण्यात आली आहे. मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता एक नोकरी करत असतो आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर असते. तसेच त्याची पत्नी महागड्या गाड्या, महागडी ज्वेलरी अशा अनेक गोष्टींची स्वप्ने पाहात असते. २०१९मध्ये ही मालिका प्रदर्शित झाली होती. त्यावेळी पाकिस्तानमध्ये ही मालिका हिट ठरली होती. आता सोनी वाहिनीवर येणाऱ्या मालिकेची कथा अशीच असल्याचे दावा नेटकऱ्यांनी केला आहे.

‘कामना’ मालिकेचा प्रोमो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने, ‘कामना मालिका ही मेरे पास तुम होचा रिमेक आहे असे मला एकटीला वाटत आहे का? २५ भागांची कथा आता २५० भागांमध्ये दाखवण्यात येईल कारण हा इंडियन ड्रामा आहे’ अशी कमेंट करत खिल्ली उडवली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘मेरे पास तुम होचे इंडियन व्हर्जन’ अशी कमेंट केली आहे.

Story img Loader