Indian Filmmaker Saawan Kumar Tak Passes Away at 86 in Mumbai : प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावनकुमार टाक यांचे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आणि अवयव निकामी झाल्याने आज गुरुवारी (२५ ऑगस्ट) संध्याकाळी ४.१५ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सावन कुमार यांचे पुतणे आणि चित्रपट निर्माते नवीन टाक यांनी याबाबतची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन टाक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावन कुमार हे गेल्या काही वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना गेले काही दिवस खूप अशक्तपणाही जाणवत होता. तसेच काही दिवसांपासून त्यांना अचानक ताप येत होता. त्यांना न्युमोनिया झाला असावा, असे आम्हाला वाटत होते. त्यामुळे आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची फुफ्फुस पूर्णत: निकामी झाल्याचे आढळून आले. तसेच त्यांना हृदयासंबंधी समस्याही होत्या, अशी माहिती समोर आली. यानंतर त्यांची प्रकृती खालवली.
आणखी वाचा : Pradeep Patwardhan Passes Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

सावन कुमार हे गेल्या ३० ते ४० वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत संजीव कुमार ते सलमान खान यांसारख्या कलाकारांसोबत काम केले होते. सावन कुमार टाक यांचा ‘नौनिहाल’ हा निर्माता म्हणून पहिला चित्रपट होता. यात संजीव कुमार यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. सावन कुमार टाक यांनी अभिनेत्री मीना कुमारीसोबतही काम केले होते. १९७२ यावर्षी प्रदर्शित झालेला ‘गोमती के किनारे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. संजीव कुमार, मीना कुमारी, राजेश खन्ना, जीतेंद्र, श्रीदेवी, जया प्रदा, सलमान खान यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले होते.

सावन कुमार यांनी ७० ते ८० च्या दशकात अनेक चित्रपटांची निर्मिती तसेच दिग्दर्शन केले होते. यात ‘हवस’, ‘सौतन’, ‘साजन बिन सुहागन’, ‘सौतन की बेटी’, ‘सनम बेवफा’, ‘बेवफा से वफा’, ‘खलनायिका’, ‘माँ’, ‘सलमा पे दिल आ गया’, ‘सनम हरजाई’, ‘चांद का तुकडा’ यासारख्या अनेक चित्रपटाचा समावेश आहे. सावन कुमार यांचे बहुतांश चित्रपट हे महिलांवर आधारित असायचे. यासाठी त्यांना खास ओळखले जायचे.

आणखी वाचा : Sonali Phogat : टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सावन कुमार टाक यांचा जन्म जयपूर, राजस्थान येथे झाला होता. सावन कुमार टाक यांना चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाव्यतिरिक्त कविता आणि गाणी लिहिण्याची खूप आवड आहे. त्यांनी त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त इतर चित्रपट निर्मात्यांच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्यापैकी अनेक सुपरहिट ठरली.

सावन कुमार यांनी सबक (१९७३) याच चित्रपटातील ‘बरखा रानी जरा जमके बरसो या चित्रपटातील गाणे लिहिले आहे. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले होते. तसेच सावन कुमार टाक दिग्दर्शित ‘सौतन (१९८३) या चित्रपटातील ‘जिंदगी प्यार का गीत है’ आणि ‘हवस’ चित्रपटातील ‘तेरी गल्ली में ना रहेंगे कदम’ हे गाणे त्यावेळी प्रचंड गाजले होते. सावन कुमार टाक यांना हृतिक रोशनच्या कहो ना प्यार हे (२०००) या चित्रपटातील टायटल साँगही लिहिले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian filmmaker saawan kumar tak died at 86 in mumbai nrp
Show comments