‘हसीन दिलरुबा’ हा विनील मॅथ्यू दिग्दर्शित चित्रपट २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. साचेबद्ध आशय आणि मांडणीतील हिंदी चित्रपटांची सवय असलेल्या प्रेक्षकांना कनिका धिल्लन या तरुण लेखिकेची कथा-पटकथा असलेला ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट काहीसा सुखद धक्का होता. या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने राणी आणि रिशू या दोन पात्रांची पुढची कथा ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या नावाने पुन्हा प्रेक्षकांसमोर आली आहे.

‘हसीन दिलरुबा’मध्ये राणी आणि रिशूची गोष्ट ज्या वळणावर येऊन थांबली होती, त्याचा विचार करता त्यांचं पुढे काय झालं? ते खऱ्या अर्थाने एकत्र आले का? या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या पुढच्या गोष्टीला निश्चितच जागा होती. त्यामुळे तेच सूत्र पकडून ‘फिर आई हसीन दिलरुबा’चा घाट घातला गेला आहे. मात्र यावेळी गोष्टीतली गंमत चढत्या भाजणीने वाढवण्यासाठी त्यातली गुंतागुंत अधिक वाढवण्यात आली आहे. ‘फिर आई हसीन दिलरुबा’मध्ये सुरुवातीपासूनच गोष्ट गुंत्यात अडकलेली आहे. मात्र इथे या दोघांच्या गोष्टीत ठकास महाठक या न्यायाने तिसरा ठक येऊन भेटतो. ज्वालापूरपासून फार लांब नाही, तरी आगऱ्यात रिशू आणि राणी स्वतंत्रपणे राहातायेत आणि लपूनछपून आपलं प्रेम जपतायेत. दोघांना आयुष्यभरासाठी एकत्र यायचं आहे आणि त्यासाठी देशाबाहेर पळून जाणं हा एकच मार्ग त्यांच्याकडे उरला आहे. व्हिसा-पासपोर्टसाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी राणी पार्लरमध्ये काम करते आहे, रिशू कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्यापासून बरीच कामं करतो आहे. पोलिसांपासून बचाव करत बिघडलेली गाडी रुळावर आणण्यासाठी धडपडणाऱ्या रिशूच्या मागे पूनम नावाचा लकडा लागला आहे. तर राणीला पाहताच अभिमन्यूचा कलिजा खलास झाला आहे. एरवी या दोघांची दखल या प्रेमवीरांनी घेतलीही नसती, मात्र प्रेम वाचवण्यासाठी ज्या नीलला या दोघांनी संपवलं आहे, त्याचे काका इन्स्पेक्टर मृत्युंजय नव्याने या प्रकरणाचा तपास हातात घेतात. आणि या नव्या संकटातून वाचण्यासाठी अभिमन्यूचा वापर करायचा असं रिशू – राणी ठरवतात.

हेही वाचा >>> Video: “सॉरी कियारा…”, सिद्धार्थ मल्होत्राबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉडलने मागितली माफी

‘फिर आई हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातल्या दोन मुख्य पात्रांसमोर येणाऱ्या अडचणी आणि त्यात प्रसंगानुरूप येत गेलेल्या नव्या व्यक्तिरेखा, त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या नव्या समस्या यांची चढती भाजणी करण्यात आली आहे. या दोन पात्रांना उसंतही मिळू नये इतक्या वेगाने व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येतात. कनिका धिल्लन यांनीच या दुसऱ्या चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यामुळे आधीच्या चित्रपटातली मूळ पात्रं त्यांच्या स्वभावानिशी, भावनिक छटांसह तशीच्या तशी इथे भेटतात.

दिग्दर्शक म्हणून जयप्रद देसाई यांनीही मांडणी करताना या मूळ गाभ्याला धक्का लावलेला नाही, मात्र कथेला एक निश्चित वेग दिला आहे. प्रेमत्रिकोणातलं संघर्षनाट्य अधिकाधिक वाढत जातं. त्यात मृत्युंजयचा तपास, पोलिसांचा आवळत आणलेला फास अशा कित्येक घटकांचा वापर दिग्दर्शकाने खुबीने यात करून घेतला आहे. अर्थात, गुंतागुंत बळकट होताना राणी आणि रिशू पहिल्या भागापेक्षा इथे सराईत गुन्हेगार अधिक वाटतात. त्यांच्यावर परिस्थिती आणि दिनेश पंडित यांच्या कादंबऱ्यांचा प्रभाव आहे हे मान्य केलं तरी मूळ गोष्टीतल्या या दोघांशी मेळ साधता येत नाही. नाही म्हणायला राणीची रिशूबरोबरची निष्ठा आणि चटकन प्रेमात पडण्याचा तिचा स्वभाव यामुळे तिच्या मनाची होणारी घालमेल आणि नात्यावर होणारा परिणाम याचा काही प्रमाणात वापर करून घेतला आहे. पण इथे वेगाने घडणारं कथानक असल्याने भावगर्भ मांडणी वा प्रसंगांना पुरेसा वावच मिळत नाही.

खेळातलं नाट्य आणि ते रंगवण्यासाठी विक्रांत मसी – तापसी पन्नू या दोघांबरोबरच नव्याने दाखल झालेल्यांपैकी अभिमन्यूची व्यक्तिरेखा या दोघांच्या तुलनेत नव्या असलेल्या अभिनेता सनी कौशलने विलक्षण रंगवली आहे. त्याने त्याच्या देहबोलीसह, विशिष्ट प्रकारचे कपडे, संवादफेक सगळ्याचा वापर करत वरून शांत, समजूतदार वाटणारा विक्षिप्त अभिमन्यू चांगला रंगवला आहे. विक्रांत मसी आणि तापसी पन्नू या दोघांच्या व्यक्तिरेखा इथे थोड्या अधिक प्रगल्भतेने समोर येतात. आणि त्यांच्या नात्यातील गंमत केवळ नजरेतून अधिक ग्लॅमरस, स्टाइलाज्ड करण्याचा दोघांचा प्रयत्न इथे अधिक आकर्षक वाटतो. जिमी शेरगिलचा मृत्युंजय कथा पुढे नेण्यात पुरेसा प्रभावी आहे, मात्र ठरावीक संवादाचा लहेजा पकडण्याचा त्याचा प्रयत्न इथे पुरेपूर फसला आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य हे त्याच्या कथेत आणि मांडणीत आहे. ही कथा रंगवण्यासाठी त्या ताकदीच्या कलाकारांची जोडही मिळाली आहे, त्यामुळे यावेळी ही हसीन दिलरुबा आपल्याला भुलवण्यापेक्षा शेवटपर्यंत गुंतवून ठेवते, असं म्हणायला हरकत नाही.

फिर आई हसीन दिलरुबा

दिग्दर्शक – जयप्रद देसाई

कलाकार – तापसी पन्नू, विक्रांत मसी, सनी कौशल, जिमी शेरगिल.

Story img Loader