‘इंडियन आयडल १२’ च्या ग्रॅण्ड फिनालेला सुरूवात झालीय. ‘इंडियन आयडल १२’ मधील सर्वच स्पर्धक आपल्या दमदार परफॉर्मन्सने एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत. दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झालेला हा ग्रॅण्ड फिनाले रात्री १२ पर्यंत सुरू राहणार असून या महा फिनालेमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाचा खजिनाच पहायला मिळतोय. या महा फिनालेमध्ये धमाका करण्यासाठी द ग्रेट खली ‘इंडियन आयडल १२’ च्या स्टेजवर पोहोचला. पैलवान खलीने स्टेजवर एन्ट्री करताच मोठा धमाका केलाय. त्याने असं काही केलं की समोर बसलेले सगळे प्रेक्षक थक्क झाले. सुरांच्या मैदानात पिळदार शरीराची शक्ती पाहून प्रत्येक प्रेक्षकवर्ग हैराण झाला.

‘इंडियन आयडल १२’ च्या मेकर्सनी नुकताच याचा एक प्रोमो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या प्रोमोमध्ये द ग्रेट खलीची धमाकेदार एन्ट्री दिसून आली. सर्वात आधी शो चा होस्ट जय भानुशाली द ग्रेट खलीचे पाया पडताना दिसून येतो. त्यानंतर तो द ग्रेट खलीला शोमधील स्पर्धक दानिशसोबत स्पर्धा करण्यासाठी सांगतो. यावेळेलाही द ग्रेट खलीने तेच केलं जे तो आतापर्यंत त्याच्या विरोधी स्पर्धकांसोबत करत आला आहे. खलीने दानिशला अगदी कागदाप्रमाणे उचललं आणि स्टेजवरून बाहेर फेकून दिलं. हे पाहून समोरील प्रेक्षकांसह सारेच जण थक्क झाले.

तुम्ही ही पहा हा धमाकेदार व्हिडीओ :

‘इंडियन आयडल १२’च्या आजच्या महा फिनालेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. रात्री १२ च्या सुमारास या शो मधील विजेत्याचं नाव घोषित करण्यात येणार आहे. या वेळेत शो चे मेकर्स एक नाही तर दोन विजेते घोषित करणार असल्याचं बोललं जातंय. शो मधील विजेत्याला ट्रॉफीसोबतच २५ लाखांचा चेक देखील देण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर एका म्युझिक कंपनीसोबत गाणं गाण्याची संधी देखील देण्यात येणार आहे.