‘बाहुबली’ भारतीय चित्रपट इतिहासातील मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाच्या फक्त दुसऱ्या भागाने जवळपास ९२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या चित्रपटाने साडेसहाशे कोटी रुपयांची कमाई केली होती. या वेळी दुप्पट बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट लवकरच कमाईच्या बाबतीत १ हजार कोटी रुपयांचा पल्ला गाठण्याच्या तयारीत आहे. असा हा ऐतिहासिक चित्रपट जिथे घडला त्या हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटीत गेले वर्ष-दीड वर्ष बाहुबलीची माहिष्मती सजली-धजली होती. मात्र चित्रीकरण संपले, चित्रपट प्रदर्शित झाला आणि ही माहिष्मतीची मायानगरीही इथून लुप्त झाली. आता फक्त तिथे भल्लालदेवचा भग्न पुतळा उरला आहे!
एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ हे दोन्ही चित्रपट व्हीएफएक्सच्या कमाल तंत्राने पडद्यावर जिवंत झाले आहेत. मात्र व्हीएफएक्सची किमयागारी साधतानाही बाहुबलीची माहिष्मती अनेक छोटय़ा-मोठय़ा तपशिलांसह कलादिग्दर्शक साबु सिरील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तंत्रज्ञांनी रामोजी फिल्मसिटीत उभी केली होती. रामोजी फिल्मसिटीत मध्यवर्ती ठिकाणी हा सेट उभा करण्यात आला होता. पहिल्या चित्रपटापेक्षाही दुसरा भाग अधिक मोठय़ा प्रमाणावर चित्रित केला गेला. त्यामुळे त्याचा सेटही तितकाच भव्य आणि वेगवेगळ्या गोष्टी दाखवणारा होता. माहिष्मती साम्राज्याचा डौल उभा करताना राजदरबार, बाहुबली-भल्लालदेव यांच्या प्रत्यक्ष वावराची जागा, मंदिर, देवसेनेची कुंतलनगरी, तिचा राजवाडा असे छोटे-मोठे सेट इथे उभारण्यात आले होते. गेली अडीच-तीन वर्षे हा सेट इथे डौलात उभा होता. त्यामुळे आता हा चित्रपट इतका लोकप्रिय ठरल्यानंतर या सेटलाही महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र ज्या सेटच्या जोरावर राजामौली यांनी माहिष्मतीची मायानगरी उभी केली त्यांनी चित्रपट संपल्यावर मात्र ही मायानगरी पूर्णपणे काढून टाकली असल्याची माहिती रामोजी फिल्मसिटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चित्रीकरणाची सत्रे तासांत मोजायची झाली तर त्या हिशोबाने जवळपास या टीमने ६३० दिवस काम केले. गेली अडीच वर्षे ‘बाहुबली’ची पूर्ण टीम राजामौली, दोन्ही नायक प्रभास आणि राणा डुग्गुबाती गेली अडीच वर्षे आपल्या घरापासून दूर या सेटवर काम करत होते. या चित्रपटाचे पंच्याहत्तर टक्के चित्रीकरण हे इथे झाले आहे. फक्त त्यातील जो धबधब्याचा भाग होता तो केरळमध्ये महबलीपुरममध्ये चित्रित करण्यात आला. तर उरलेला बराचसा भाग हैद्राबादमध्येच इनडोअर स्टुडिओत पूर्ण करण्यात आला होता. सुरुवातीला ही टीम चित्रीकरणासाठी एकत्र आली तेव्हा एकीकडे सेट आणि दुसरीकडे पंचतारांकित हॉटेलचा निवास या नेहमीच्या फंडय़ाप्रमाणेच तिथे कार्यरत होती. मात्र काही दिवसांनी चित्रीकरणाची पूर्वतयारी सुरू झाली तेव्हा पटकथा वाचनासह, तालमीकरता त्यांचे एकत्रित राहणे खूप गरजेचे होते. त्यामुळे राजामौली यांनी एकत्र काही तरी निवासाची सोय केली जावी, अशी सूचना दिली. तेव्हा फिल्मसिटीतच ‘वसुंधरा व्हिला’ नावाचे फार्महाऊस आहे. तिथे त्यांची सोय करण्यात आली होती. आठ खोल्यांच्या या फार्महाऊसमध्ये राजामौली, प्रभास, राणा, तमन्ना, रामैय्या अशा प्रमुख कलाकारांसह मुख्य टीम कित्येक दिवस एकत्र राहात होती. जसजशी पूर्वतयारी संपली आणि चित्रीकरणही सुरू व्हायच्या बेतात असताना मात्र एकत्र राहण्यापेक्षा प्रभास, राणा आणि स्वत:साठी वेगवेगळे निवासस्थान तेही सेटच्याच परिसरात असावे अशी मागणी राजामौली यांनी केली. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत या तिघांसाठी सगळ्या सुखसोईंनी सज्ज अशी तीन वेगवेगळी घरे सेटच्या परिसरात बांधून देण्यात आली. मात्र आता ही घरे किंवा तो भलामोठा सेट यापैकी काहीही शिल्लक नसल्याचे तिथले अधिकारी सांगतात. या भव्यदिव्य चित्रपटाचा तामझाम लक्षात आणून देणारा एकच एक भल्लालदेवाचा पुतळा तेवढा तिथे अजून उभा आहे. बाकी सगळा सेट मोडून टाकण्याच्या सूचना राजामौली यांनी दिल्या होत्या.
भल्लालदेवचा भला मोठा पुतळा हा ‘बाहुबली’च्या पहिल्या भागातही केंद्रस्थानी होता. दुसऱ्या भागात त्याचा फारसा वापर झाला नसला तरी भल्लालदेवचा शेवट दाखवताना मात्र या पुतळ्याचाच दिग्दर्शकाने चांगला वापर करून घेतला आहे. भल्लालदेवाच्या पुतळ्याचा छातीपर्यंतचा भाग डोंगरदऱ्यांवरून कोसळत, धबधब्यातून वाहत अखेर शंकराच्या पिंडीशी येऊन पडतो, हे चित्रपट संपतानाचं दृश्य आहे. त्यानंतर पाश्र्वभूमीवर हॉलीवूडपटांच्या शैलीत महेंद्र बाहुबलीच्या मुलाचा आणि कटप्पाचा संवाद प्रेक्षकांना दिग्दर्शकाने ऐकवला आहे. जेणेकरून कधीकाळी तिसरा भागही काढण्याची शक्यता दिग्दर्शकाने दाखवून दिली असली तरी प्रत्यक्षात त्याच्या सेटचा भाग मात्र त्यांनी शिल्लक ठेवलेला नाही. भल्लालदेवचा पुतळा हा त्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राणा डुग्गुबाती याच्या विनंतीवरून तिथे ठेवण्यात आला आहे. राणासाठी हा पुतळा खास महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा पुतळा तोडू नका, अशी विनंती राणाने राजामौली यांच्याकडे केली होती. हा पुतळा आपल्या जवळ असावा, अशी राणाची इच्छा असून लवकरच तो त्याची सोय करणार आहे. त्यामुळे निदान काही दिवस तरी भल्लालदेवचा हा पुतळा फिल्मसिटीत राजामौली यांच्या भव्य ‘बाहुबली’ची साक्ष देण्यासाठी उभा आहे!