|| प्रशांत केणी

१९७५ आणि १९७८च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ फक्त हजेरी लावून आला होता. ईस्ट आफ्रिका या संघावरील एकमेव विजय हीच भारताची दोन विश्वचषकांतील पुंजी होती. त्यामुळे १९८३ मध्ये भारतीय संघाकडून कुणीही विश्वविजेतेपदाच्या अपेक्षा केल्या नव्हत्या; परंतु सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये अनपेक्षित, अविश्वसनीय असे घडले. भारताने चक्क विश्वचषक जिंकला. कर्णधार कपिल देव या ऐतिहासिक यशाचा शिल्पकार होता. ‘हरयाणा हरिकेन’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या कपिलने आपल्या पराक्रमाने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकला. कलात्मक आणि पाठ्यपुस्तकी क्रिकेटला तिलांजली देत कपिलने आपल्या मुक्तछंदी फटकेबाजी आणि हुकमी आऊर्टंस्वगरने भारताला सुवर्णकाळ दाखवला. याच विश्वचषकापासून भारतात क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थाने रूढ झाला, नव्हे जीवनाचा अविभाज्य भाग झाला. कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ हा चित्रपट म्हणजे १९८३च्या विश्वचषकाचा प्रवास आहे. संदर्भांची चोख उजळणी करीत तो पाहताना सिनेमागृहाचे रूपांतर स्टेडियममध्ये होते. विवियन रिचड्र्सचा झेल या सुरुवातीपासून ते कपिलने लॉड्र्सच्या गॅलरीत भारताचे जगज्जेतेपद उंचावून समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली… इथपर्यंतचा प्रत्येक क्षण आपल्याला खिळवून ठेवतो. चित्रपटाला पूर्णविराम देतानाही कपिलचे छोटेखानी भाष्य त्याचा आलेख उंचावतो.

१९८३च्या विश्वविजेतेपदाचा चित्रपट करताना तो माहितीपट होणार नाही, याची आवर्जून काळजी घेताना कबीरने स्टेडियमसह प्रत्येक घटनाक्रमात कुठेही तडजोड न केल्याचे प्रत्ययास येते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यालयात विश्वचषकासाठी आलेले पत्र आणि त्याबाबत कर्मचाऱ्याचा दृष्टिकोन येथून हा भारतीय क्रिकेट संघावरील किमान अपेक्षांचा प्रवास सुरू होतो. इंग्लंडस्थित भारतीय चाहत्यांकडून भारताचे सामने पाहणे म्हणजे पैशांचा अपव्यय असे ताशेरे मारले जातात. अंतिम फेरीपर्यंत भारत पोहोचूच शकणार नसल्याची खात्री असल्याने संयोजक लॉड्र्स स्टेडियमचा अधिस्वीकृती कार्डावर उल्लेख करीत नाहीत. अगदी भारतीय विमानतळावरही देशी क्रिकेटपटूंची नको, तर रिचड्र्सची स्वाक्षरी हवी, अशी मागणी कर्मचारी करतो. इतकेच कशाला? परतीची तिकिटेही तीन दिवस आधी म्हणजे २२ जूनची काढलेली असतात. इंग्लंडच्या विमानतळावरही विंडीजच्या क्रिकेटपटूंचा रुबाब आणि जंगी स्वागत होते; पण भारतीय संघाकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. ‘‘३५ साल पहले हम लोग आजादी जीते थे, लेकीन इज्जत जीतना अभी बाकी है, कप्तान,’’ हे संघाचे व्यवस्थापक पी.आर. मार्नंसग यांचे वाक्य काळजाला भिडते. आम्ही ‘‘इथे विश्वचषक जिंकायला आलो आहोत,’’ हे कपिल आपल्या मोडक्यातोडक्या इंग्रजीत इंग्लंडमधील पत्रकार परिषदेत सांगतो. तेव्हा ते हसण्यावारी घेतले जाते; पण साखळीमधील वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेवरील सुरुवातीच्या विजयांनी भारताचा आत्मविश्वास उंचावतो. मग ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजकडून पत्करलेल्या पराभवामुळे भारताच्या आव्हानाला धक्का बसतो. याच प्रसंगी झालेल्या मध्यंतरात अपयशाने खचलेला भारतीय संघ आणि गाडीबाहेरील विंडीजच्या चाहतावर्गाच्या महासागरात एका पित्याच्या खांद्यावर बसून भारताचा झेंडा उंचावणारा लहान मुलगा त्यांना बळ देतो.

मध्यंतरानंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ५ बाद १७ अशा केविलवाण्या स्थितीत भारत असताना कपिलने साकारलेली १७५ धावांची विक्रमी खेळी साकारली. ‘बीबीसी’च्या संपाची झळ बसल्याने सामन्याचे चित्रीकरण झाले नाही; परंतु सांख्यिकी रूपातील आकडे आणि कपिलच्या नटराज फटक्यासह अनेक छायाचित्रे याआधारे कुठेही गफलत न करता तो सामना साकारला आहे. त्यानंतर अखेरच्या साखळीतील ऑस्ट्रेलियावरील विजय, उपांत्य सामन्यात इंग्लंडवरील मात हे टप्पे ओलांडत चित्रपट उत्कंर्ठांबदूपर्यंत म्हणजेच अंतिम फेरीपर्यंत पोहोचतो. विंडीजविरुद्धचा अंतिम सामना आणि त्यानंतरचा जल्लोष हे क्षण प्रेक्षकांना थेट प्रक्षेपित सामन्याप्रमाणेच अनुभवता आले, याचे श्रेय अर्थातच दिग्दर्शकाला द्यायला हवे.

नवाबपूर दंगलीवर क्रिकेटचा उपचार करण्याची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कल्पना, एकाच जागी उभे राहण्याचे श्रद्धाळूपण, बर्लंवदर संधू आणि अन्य काही क्रिकेटपटूंचे वैयक्तिक आयुष्यातील झगडणे असे अनेक कंगोरे उत्तमपणे टिपत चित्रपटाने अष्टपैलुत्व सिद्ध केले आहे. ८३चा नायक कपिल हा रणवीर सिंगने बोली, देहबोली, खेळाची शैली अशा सर्व छटांसह १०० टक्के साकारला आहे. दीपिका पदुकोणने रोमी उत्तम रेखाटली आहे. कृष्णम्माचारी श्रीकांत साकारणारा जिवा भाव खाऊन जातो. भारतीय दूतावासाच्या मेजवानीतील भाषणातले गांभीर्य तर अन्य प्रसंगांमध्ये तो चपखल विनोद निर्माण करतो. पंकज त्रिपाठी यांचा मार्नंसग, ताहिर राजचा सुनील गावस्कर, चिराग पाटीलचा संदीप पाटील, अ‍ॅमी विर्कचा संधू, निशांत दहियाचा रॉजर बिन्नी, साकिब सलीमचा र्मोंहदर अमरनाथ भूमिकांना उत्तम न्याय देण्याचा प्रयत्न करतात. कौसर मुनीरने लिहिलेले आणि अर्जित सिंगने गायलेले ‘लहरा दो…’ हे शीर्षकगीत तसेच अन्य गीतेसुद्धा चित्रपटाच्या एकूण ताळेबंदाला पूरक आहेत.

क्रिकेटद्वारे टेलिव्हिजन जनमानसात रुजतानाच्या त्या काळात ईसीटीव्हीचे संच यांसारखे असंख्य छोटेछोटे मुद्देसुद्धा चित्रपटात जपले आहेत. ८३च्या इतिहासाचे यथोचित संदर्भांसहित स्पष्टीकरण आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत सदैव धगधगत ठेवत भावनिकता निर्माण करणे, हे सूत्र चित्रपटात ‘चक दे इंडिया’प्रमाणेच यशस्वीपणे सांभाळले आहे. भारताच्या क्रिकेटमधील पहिल्या विश्वविजयावर आधारित हा चित्रपट जरूर पाहायला हवा.

८३

दिग्दर्शक : कबीर खान; कलाकार : रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, जिवा, पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, साकिब सलीम, जतीन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री.