पुलित्झर पुरस्कार विजेत्या पत्रकार-लेखिका इसाबेल विल्करसन यांच्या ‘कास्ट – द ओरिजिन्स ऑफ अवर डिसकन्टेन्ट्स’ या पुस्तकावर आधारित ‘ओरिजिन’ या डय़ुवेर्ने दिग्दर्शित चित्रपटाचा प्रीमिअर नुकताच ८०व्या प्रतिष्ठित व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पार पडला. भारताच्या दृष्टीने हा चित्रपट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा ठरतो. जातिभेदाचे भूत आणि वर्तमानकाळातील वास्तव जगभरात कसे एकसमान आहे याकडे लक्ष वेधत त्यामागच्या कारणांचा चित्रभाषेत वेध घेणाऱ्या चित्रपटात आपल्याकडील दलित समाजाचीही कथाव्यथा मांडण्यात आली आहे. या अनुषंगाने पहिल्यांदाच हॉलीवूडपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख, त्यांचा विचार मांडण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय विचारवंत डॉ. सूरज एंगडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते, सल्लागार आणि अभिनेते अशा तिहेरी भूमिकेतून ‘ओरिजिन’शी जोडले गेले आहेत. ‘ओरिजिन’ या चित्रपटातील बाबासाहेबांचा उल्लेख आणि त्याच्याशी पहिल्यांदाच एका भारतीय अभ्यासकाचे जोडले जाणे या दोन्ही गोष्टी कशा जुळून आल्या याबद्दल बोलताना डॉ. सूरज एंगडे यांनी इसाबेल विल्करसन यांच्या पुस्तकाकडे लक्ष वेधलं. ‘इसाबेल यांच्या ‘कास्ट – द ओरिजिन्स ऑफ अवर डिसकन्टेन्ट्स’ या पुस्तकात माझा संदर्भ होता. मी गेली कित्येक वर्ष आपल्याकडील बहुजन समाज, जातिव्यवस्था यांच्याबरोबरीने आफ्रिकन अमेरिकन समाज, तेथील जातजाणिवा, विस्थापित कामगार याविषयी अभ्यास-संशोधन केलेलं आहे. माझ्या अभ्यासाचा संदर्भ या पुस्तकात होता. त्यामुळे एव्हा डय़ुवेर्ने यांनी जेव्हा पुस्तकावर आधारित चित्रपटाची तयारी सुरू केली तेव्हा साहजिकच माझ्याशी संपर्क साधला. मी या विषयातील जाणकार असल्याने चित्रपटासाठी सल्लागार आणि सहनिर्मात्याची भूमिका स्वीकारावी ही एव्हाची इच्छा होती. आणि माझीच व्यक्तिरेखा पुस्तकात असल्याने ती अन्य कलाकाराने करण्याऐवजी मीच साकारावी असे त्यांनी सुचवल्याने या तिन्ही भूमिकेतून मी चित्रपटाच्या प्रक्रियेत सक्रिय होतो’, असे सूरज यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा