India’s Got Latent Controversy: ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा युट्यूबवरील लोकप्रिय शो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यामागचं कारण आहे रणवीर अलाहाबादियाचं आक्षेपार्ह वक्तव्य. काही दिवसांपूर्वी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीर अलाहाबादिया परीक्षक म्हणून उपस्थित राहिला होता. यावेळी त्याने आई-वडिलांसंबंधित एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं; ज्यामुळे सध्या सर्व स्तरातून रणवीरवर टीका केली जात आहे. तसंच आता ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व भाग युट्यूबवरून हटवण्याची आणि निर्मात्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पण हा वादग्रस्त शो होस्ट करणारा आणि इन्स्टाग्रामवर ६० लाख फॉलोअर्स असणारा समय रैना एकाच व्यक्तीला फॉलो करतो? आणि ती व्यक्ती कोण? हे तुम्हाला माहितीये का? तर जाणून घ्या…
समय रैना हा एक लोकप्रिय भारतीय स्टँडअप कॉमेडियन आणि युट्यूबर आहे. २७ वर्षांचा समय हा मूळचा जम्मूचा असून तो कश्मिरी पंडित आहे. कॉमेडी व्यक्तिरिक्त समय रैना हा बुद्धिबळ खेळात खूप हुशार आहे. त्याने करोनाच्या काळात युट्यूबवर मोठ्या बुद्धिबळपटूंबरोबर खेळाच्या लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे बरीच लोकप्रियता मिळवली.
समयने पुण्याच्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग पदवी घेतली आहे. याशिवाय २०१९मध्ये ‘अॅमेझोन प्राइम व्हिडीओ’वरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘कॉमिकस्तान सीझन २’मधून समयने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कॉमेडियन आकाश गुप्ताबरोबर समय या शोचा विजेता झाला होता. त्यानंतर अनेक शोमधून समयने प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम आहे. पण ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. समयच्या युट्यूबवर ७ मिलियन ( ७० लाख ) सब्सक्रायबर्स असून इन्स्टाग्रामवर ६ मिलियन ( ६० लाख ) फॉलोअर्स आहेत. पण समय इन्स्टाग्रामवर एकाच व्यक्तीला फॉलो करतो.
समय रैना इन्स्टाग्रामवर फॉलो करणारी ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून राखी सावंत आहे. समयच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये शोमध्ये राखी सावंत परीक्षक म्हणून उपस्थित राहिली होती. तिचा हा भाग खूप चर्चेत राहिला होता.
माहितीनुसार, समय रैनाची एकूण संपत्ती १९५ कोटींच्या जवळपास आहे. तो दर महिन्याला युट्यूब व्हिडीओ आणि अनेक शोच्या माध्यमातून १.५ कोटींची कमाई करतो. तसंच इतर ब्रँड डील आणि लाइव्ह शोच्या माध्यमातून त्याच्या संपत्तीत वाढ होतं असते.