गेल्या दहा-पंधरा वर्षांत समाजातील बहुतांशांना सर्वात मोठे व्यसन कोणते लागले असेल, तर समाजमाध्यमामधून दुसऱ्याची ख्याली-खुशाली किंवा जगण्याच्या उपलब्ध घडामोडी पाहण्याचे. गंमत म्हणजे मुळात माध्यमांच्या लोकप्रियतेसोबत आपल्याला असे काही व्यसन लागले आहे, याची जरा देखील कल्पना कोणत्याही व्यक्तीला नसते. प्रत्येक जण आपल्या लाडक्या किंवा दोडक्या व्यक्तीची सद्य:स्थिती इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा ट्विटरवर पाहू शकतो. लाइक करू शकतो. गुपचूप पाहून एखाद्याच्या जगण्याचा पाठलाग करू शकतो. व्यक्तिगतरीत्या असूया किंवा मत्सरही बाळगू शकतो. यात सर्वाधिक वेळा हेवा- कुतूहलासोबत आपल्याकडे नसलेल्या गोष्टीची खंत व्यक्ती आत्मसंवादात व्यक्त करून नव्या असूया आजाराची आपोआप निर्मिती होत असते. भल्याभल्या निकोप समाजामध्ये मोबाइल, इंटरनेट आणि ढिगांनी तयार झालेल्या समाजमाध्यमांमुळे हा आजार फोफावत आहे आणि मानसशास्त्रज्ञांपासून समाज अभ्यासकांसमोर नवी कोडी तयार होत आहेत. सध्या उग्र नसला तरी घराघरांत मोबाइलचुंबक बनलेल्या पिढीचा भविष्यकाळ दाखविणारा ‘इन्ग्रिड गोज वेस्ट’ हा चित्रपट आजच्या पिढीचे आणि जगण्याचे प्रतिबिंब दाखविण्यात यशस्वी ठरला आहे.
इन्ग्रिड गोज वेस्ट पाहण्यासाठी सर्वात मोठे कारण हे (जागतिक सामाजिक प्रश्न असला तरी) त्यात असली अभिनेत्री ऑब्री प्लाझा हे आहे. गेल्या पाचेक वर्षांमध्ये या अभिनेत्रीने केलेले ‘सेफ्टी नॉट गॅरेण्टेड’, ‘द टू डू लिस्ट’, ‘लाइफ अफ्टर बेथ’ हे सिनेमे या बंडखोर आणि शॅमेलियन कौशल्याच्या अभिनेत्रीसाठी आवर्जून पाहावेत असे आहेत. या चित्रपटात निर्मातीच्याही भूमिकेत असल्याने ऑब्री प्लाझाच्या प्रवाहपतीत धाटणीची आणखी एक भूमिका इन्ग्रिड गोज वेस्टमध्ये पाहायला मिळते.
चित्रपटाला सुरुवात होते समाजमाध्यमावरील एका मैत्रिणीच्या होऊ घातलेल्या लग्नाचे अपडेट्स पाहून इन्ग्रिडच्या (ऑब्री प्लाझा) रडण्याच्या अवस्थेने. तिला फसवून कुणी दुसऱ्याशी लग्न करीत असल्याची तयार झालेली शंका लगेचच फिटते, जेव्हा इन्ग्रिड त्या विवाह सोहळ्यामध्ये आगंतुकरीत्या शिरून त्या नवराईला त्रास देते. केवळ समाजमाध्यमातील कचकडय़ाच्या क्षणभंगूर ओळखीतून एन्ग्रिड तिच्याशी एकरूप झालेली असते. एकारलेपणातून या नात्याचा गैरअर्थ काढत एन्ग्रिड असूया आजाराच्या टोकाला गेलेली असते. पुढल्या क्षणांमध्ये एन्ग्रिडची रवानगी जिथे असायला हवी तिथेच होते. मनोरुग्णालयामधील वातावरणात ती बरी होण्यासाठी प्रचंड धडपड करते. तिथून आजारमुक्त झाल्याचे प्रशस्तिपत्रक मिळवत घरी परतते. नव्याने आयुष्य जगायच्या तिच्या इच्छेमध्ये मासिकातील एका सेलिब्रेटीविषयी चांगलं-चुंगलं वाचून इंधन भरलं जातं. फॅशनस्वार, अनुयायांची अगडबंब आकडेवारी असलेली टेलर स्लोन (एलिझाबेथ ओल्सन) हिचे ऐषसुसज्ज आयुष्य इन्ग्रिडच्या नजरेत भरते. ती तातडीने तिच्या जगण्याचे अनुकरण करायला लागते. तिने खरेदी केलेल्या वस्तू इन्ग्रिडच्याही ताफ्यात दाखल होतात. हा प्रकार इतका वाढायला लागतो की आईने मृत्यूपश्चात ठेवलेला सारा पैसा घेऊन इन्ग्रिड आपल्या समाजमाध्यमावरच्या लाडक्या व्यक्तीचा पाठलाग करायला सज्ज होते. इन्ग्रिड टेलरच्या घराजवळ एक घर भाडय़ाने घेते. सुरुवातीला टेलरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या ठिकाणांवर तिला गाठण्याचा प्रयत्न करते. त्यात यश न आल्याने ती थेट टेलरचं कुत्रं पळवून आपल्या घरात काही दिवस ठेवते. कुत्रा हरविल्याची जाहिरात जागोजागी लागल्यावर उदार नायिकेच्या थाटात तो टेलरला परत करून तिची मैत्री संपादन करते. दोघी सर्वसाधारण मैत्रिणींसारख्या रहस्य वाटण्यापर्यंत एकमेकांच्या खूप जवळ येतात. पण अचानक गोष्टी फिस्कटतात आणि इन्ग्रिडचे खरं रूप समोर आल्यानंतर टेलर तिला टाळू लागते. पण तोवर टेलरबाबतची अनेक खरी रूपे इन्ग्रिडच्या समोर आलेली असतात. जी एकूणच आजच्या समाजाचा आरसा अधिक लख्ख करून दाखविल्यासारखी प्रेक्षकाला धक्का देऊन जातात.
समाजमाध्यमावरील आसूया आजाराच्या प्रचंड अधीन झालेली इन्ग्रिड दाखविण्यासोबत समाजात रुजत असलेली अनेक चांगली निरीक्षणे या चित्रपटामध्ये आली आहेत. त्यातील महत्त्वाचे आहे ते कलात्मक जगण्याचे किंवा जगण्यातील कलात्मकता प्रगट करण्याचे लोकांमध्ये वाढत चाललेल्या हौसेचे प्रकरण. आपल्याहून अधिक असलेल्या सेलिब्रिटीशी ओळख वाढविण्यापासून त्यांना भेटण्याचा इथला टेलरचा आजार इन्ग्रिडपेक्षा व्यापक पातळीवर गेलेला दिसतो. न वाचलेल्या पुस्तकांबाबत किंवा न जाणत असलेल्या कलेबद्दल निव्वळ बोलून प्रभाव टाकण्याची व आपल्याच कलात्मक आयुष्याची भलामण करण्याची सवय असलेल्या व्यक्तिरेखा येथे अचूकरीत्या रेखाटण्यात आल्या आहेत. या कचकडय़ाच्या व्यक्तींमध्ये वावरण्यासाठी इन्ग्रिड बॅटमॅनप्रेमी लेखकाशी प्रेमाचे नाटक रचते आणि गमती गंभीररूप दाखवायला लागतात.
इन्ग्रिड गोज वेस्ट म्हटला तर विनोदी चित्रपट आहे. पण त्यातला आशय आसूया आजाराच्या कोणत्या टप्प्यावर आपण आहोत, याचा शोध घेण्याची प्रक्रिया त्याच्या प्रत्येक दर्शकाला देण्याची किमया साधतो.