बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपचा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. दोन भागांमध्ये चित्रपटाचं कथानक अनुरागने मांडलं होतं आणि लोकांना ते खूप पसंत पडलं. मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, हुमा कुरेशीसारखे भरपूर तगडे कलाकार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाले होते. खरंतर अनुराग कश्यपच्या मनात बिहारवर एक चित्रपट बनवायचं खूप आधीपासून होतं पण काही कारणास्तव ते शक्य झालं नव्हतं. शिवाय त्याचे ‘पांच’ आणि ‘ब्लॅक फ्रायडे’सारखे चित्रपट सेन्सॉरमध्ये अडकल्याने सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनवण्यासाठी अनुराग तितकासा उत्सुकही नव्हता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२००८ मध्ये अनुरागला लेखक झिशान कादरी भेटला ज्याने प्रथम त्याला वासेपूरची कहाणी सांगितली. ती ऐकताना अनुरागचा यावर विश्वासच बसायला तयार नव्हता की गँगस्टर्सचं विश्व हे असंही असू शकतं. यानंतर चित्रपटावर काम सुरू झालं. अनुराग प्रथम या चित्रपटात भोजपुरी अभिनेता रवी किशनला घेण्यासाठी उत्सुक होता. पण नंतर रवी किशन यांच्या बाबतीत काही उलट सुलट अफवा अनुरागच्या कानावर आल्याने त्याने रवी किशनचं नाव बाद केलं. नंतर मात्र २०१८ मध्ये आलेल्या ‘मुक्काबाज’ या चित्रपटात त्याने रवी किशनला महत्वाची भूमिका दिली.

आणखी वाचा : “गँग्ज ऑफ वासेपूरमधून कुणालाच आर्थिक फायदा झाला नाही” : अनुराग कश्यपचा धक्कादायक खुलासा

वासेपूरच्या पहिल्या भागात मुख्य पात्रांपैकी एक महत्वाचं पात्र होतं ते म्हणजे सरदार खान. अभिनेता मनोज बाजपेयी याने ती भूमिका साकारली होती. या पात्रात काहीतरी वेगळं असं मनोजला सापडलं होतं, शिवाय ही भूमिका त्याने साकारलेली सर्वात उत्तम नकारात्मक भूमिका असल्याचंही मनोजने एका मुलाखतीत सांगितलं होतं. असं म्हंटलं जातं की याच भूमिकेसाठी अनुरागने मनोज ऐवजी रवी किशनला घ्यायचा विचार केला होता. अर्थात मनोज बाजपेयीमुळेच ही भूमिका आज सगळ्यांच्या कायम स्मरणात आहे.

‘गँग्स ऑफ वासेपूर’ हा अनुरागचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचं म्हंटलं जातं. याच्या दोन्ही भागांच्या निर्मितीसाठी तब्बल १८ करोड इतका खर्च आला होता. मध्यंतरी अनुरागने या चित्रपटातून कोणालाच आर्थिक फायदा झाला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. अनुरागचा नुकताच आलेला ‘दोबारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला असून सोशल मीडियावर अनुराग आणि अभिनेत्री तापसी पन्नू या दोघांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Instead of manoj bajpayee anurag kashyap wanted to cast this bhojpuri actor in gangs of wasseypur avn