एक सुपरहिट मसाला फिल्म दिग्दर्शक, तीन चुलबुले, मनमौजी कलाकार आणि एक पूर्णपणे भन्नाट विनोदी कथानक यांची भेळ जेव्हा जमते तेव्हा ‘में तेरा हिरो’ सारखा चित्रपट समोर येतो. डेविड धवन हे नाव कोणालाच नवीन नाही. सलमान खान, गोविंदा आणि डेविड धवन या जोडगळीने मिळून बॉलीवूड चित्रपट सृष्टीचं नव्वदीच दशक गाजवलेल होतं. पिळदार शरीरयष्टी, अंगावर घरची जबाबदारी घेणारा, तोलून मापून वागणारा, मुद्देसूद आणि सत्य बोलणारा, नीटनिटके कपडे घालणारा या आपल्या पारंपारिक वेशातला हिरो जेव्हा टपोरी लुकमध्ये, रंगीत कपडे घालून ‘चालती क्या नौ से बारा’ असं त्याच्या हिरोईनला विचारतो तेव्हा तिच्यासोबत थिअटरमध्ये बसलेल्या मुलीसुद्धा घायाळ होऊ शकतात ही किमया डेविड धवननी दाखवून दिली. आता ते त्यांचा नवीन सिनेमा ‘में तेरा हिरो’ घेऊन येत आहेत. यात वरुण धवनसोबत, इलियाना डी’क्रुझ, नíगस फखरी या दोन हिरोइन्स असणार आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच मनात या सिनेमाबद्दल उत्सुकता आहे. त्यानिमित्तच या तिघांची भेट घेतली. आधीच म्हटल्याप्रमाणे तिघेही मनमौजी कलाकार. हे तिघे जेव्हा एकत्र येणार तेव्हा नक्कीच धुमाकूळ घालणार हे त्यांच्याशी बोलतानाच कळत होतं.
पहिला विषय निघाला तोच डेविड धवनचा. तिघांचाही डेविड धवनबरोबरचा पाहिलाच चित्रपट. त्यामुळे तुम्हाला तिघांना त्यांच्याबरोबर काम करून कसं वाटलं?
इलियाना : डेविड धवन हे दिग्दर्शकापेक्षा एक खूप छान मित्र आहेत. सेटवर ते नुसता धुमाकूळ घालतात. मजामस्ती करत ते तुमच्यातली भीती काढून टाकतात. मी आतापर्यंत माझी एक ‘गुणी बाळ’ अशी इमेज बनवली होती. पण त्यांनी ती पूर्णपणे बदलली. ते मला म्हणतात, तू ‘कमिनी’ आहेस. साळसूदपणे स्वतचं काम करवून घेतेस.
नर्गिस : ते माझ्यासाठी सुपरमॅनपेक्षा कमी नाही. त्यांना माहित असतं त्यांना काय हवंय. पण त्याचवेळी तुमची स्पेस तुम्हाला देतात. त्याचं काम खूप मुद्देसूद आणि ठरलेलं असतं.
वरुण : माझ्यासाठी सेटवरचे बाबा हा खरा धक्काच होता. घरी आम्ही मित्रासारखे वागतो. ते माझे वडील आहेत याची जाणीव त्यांनी कधीच करून दिली नाही. कधी ओरडणं नाही, कधी मारणं नाही. आणि जेव्हा मी सेटवर पोचलो तेव्हापासून अगदी कडक शिस्तीची बाबा मला दिसले. कित्येकदा तर ते माझ्यावर रागावले सुद्धा.
इलियाना आणि नíगस यापूर्वी तुम्ही बर्फी, रॉकस्टार, मद्रास कॅफे सारखे सिरीयस सिनेमे केले आहेत. आणि हा आता पूर्णपणे मसालापट आणि विनोदी सिनेमा करायचा असं का ठरवलं?
इलियाना : बर्फीनंतर सर्वाना वाटलेलं की मी अश्याच भूमिका करू शकीन. पण असं नाही आहे. मी याआधी दाक्षिणात्य सिनेमे केले आहेत. आणीई त्यात माझ्या भूमिका खूप ग्लॅमरस असायच्या. त्यामुळे इथेही मला लोकांना दाखवून द्यायचं होतं. म्हणून मी हा सिनेमा निवडला.
नर्गिस : मला मुळातच रॉकस्टार, मद्रास कॅफे असे चित्रपट करायला आवडतात. पण आपल्याकडे असे चित्रपट खूप कमी बनतात. त्यामुळे अश्या चित्रपटांसाठी विचारणा आल्यावर मी कधीच नाही म्हणत नाही. पण मला एकाच प्रकारचे रोल करायला आवडतं नाही. माझा स्वभाव मुळातच विनोदी आहे. म्हणून विनोदी भूमिका मी कशी सोडणार होते. हा पण यानंतर मात्र परत विनोदी भूमिका वाट्याला आल्यास मी त्याबद्दल दोनदा विचार करीन.
मग एखादा चित्रपट निवडताना तुम्ही त्यात नक्की काय पाहता?
इलियाना : माझ्यासाठी चित्रपटाची स्क्रिप्ट हा चित्रपटाचा हिरो आहे. स्क्रिप्ट उत्तम असेल तर चित्रपट उत्तमच होईल. आणि दुसरा नंबर लागतो तो दिग्दर्शकाचा. आतापर्यंत मला अनुराग बासू, राजकुमार संतोषी, डेविड धवन यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालंय. ते माझं नशीबच आहे. पण माझा रोल आणि माझं सिनेमातलं स्थान हे माझ्यासाठी दुय्यम असतं.
नर्गिस : मला चांगल्या लोकांबरोबर काम करायला आवडतं. चांगलं युनिट आणि चांगली लोकं असली की काम करायला मज्जा येते. आणि आपणही छान काम करू शकतो. मग ते बॉलीवूड असोत, हॉलीवूड असोत किंवा प्रादेशिक सिनेमा मला सगळीकडे काम करायला आवडेल.
वरुण : मला खूप वेगवेगळे रोल्स करायचे आहेत. एकाच प्रकारच्या रोल्समध्ये मला अडकायचं नाही आहे. त्यामुळे माझ्या भूमिकांना मी प्राधान्य देतो.
डेविड धवन यांनी आतापर्यंत बॉलीवूडला सलमान, गोिवदा सारखे सुपरस्टार्स आणि रविना, करिष्मा सारख्या तितक्याच ताकदीच्या हिरोइन्स दिल्या आहेत. आता आपण पण त्याचं पंगतीत जाऊन बसणार असं कधीतरी वाटलं होतं का?
इलियाना : त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं हेच खरतर खूप महत्वच आहे माझ्यासाठी. मी असा विचार कधीच केला नाही.
नर्गिस : मुळात मला स्टार्स बनणं, खूप काम करणं अश्या अपेक्षा माझ्या नाहीच आहेत. माझ्या वाट्याला जे चांगलं काम येत जातंय ते मी स्विकारत जाते. त्यामुळे हा हिशोब मांडत मी नाही बसतं.
वरुण : बाबांच्या आयुष्यातील आणि त्यांच्या सिनेमातील सलमान आणि गोिवदाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. अगदी मीही नाही. आणि आज एकूणच सुपरस्टारची संकल्पना बदलली आहे. लोकांना व्हेरिएशन लागतं. त्यामुळे ते स्टारडम आता अनुभवता येत नाही.
एक स्टाईलिश हिरो आणि दोन सुंदर हिरोइन्स जेव्हा एकत्र असतील तेव्हा ‘चर्चा तर होणारच’. तुमची एकमेकांमधली केमिस्ट्री कशी होती?
इलियाना : आम्ही तिघांनी सेटवर खप मस्ती केली होती. मी आणि नíगस दोघींना इंग्रजी भाषेत विचार करायची सवय आहे. त्यामुळे कधीही स्क्रिप्ट हातात आलं की आधी आम्ही त्याचं आमच्या डोक्यात भाषांतर करत बसायचो. तो एक मुद्दा आम्हाला जोडतो. वरुणबद्दल बोलायच झालं तर, तो मस्त मित्र आहे. मी त्याच्याबरोबर गप्पा मारू शकते, मस्ती करू शकते अगदी एखाद्या जवळच्या मित्रांसारखे आम्ही आहोत.
वरुण : मी या दोघींपेक्षा थोडा नवीन आहे या क्षेत्रात. त्यामुळे त्यांच्याकडून जितकं मिळेल तितकं शिकायचं हा माझा प्रयत्न होता. पहिल्याच दिवशी मी इलियानाला साउथच्या इंडस्ट्रीबद्दल इतके प्रश्न विचारत बसलो की शेवटी तिचं मला, ‘अांता गप्प बस.’ असं ओरडली. तिची खाण्याची हौस सुद्धा अजब आहे. एकदा आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करत होतो. मी फक्त ग्रीन टी पीत होतो. पण माझ्यासमोर हिने इतकं ब्रेडजॅम खाल्लं. की शेवटी मला पण राहवलं गेलं नाही.
नर्गिस : आम्ही छान मित्र बनलोय. मी आणि इलियाना न्यूयॉर्क आणि वेस्टर्न संगीताबद्दल बोलायचो. तर वरूणसोबत मी युकेमधल्या माझ्या आठवणी शेअर करायची. तोही शिक्षणानिमित्त तिथे काही वर्ष होता. त्यामुळे तेथील मित्र, खाण, लाइफस्टाइल याबद्दल त्यालाही ओढ आहे.