दिग्दर्शक, निर्माते, कवी, लेखक अशा अनेक क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करणाऱ्या नागराज मंजुळेंनी ‘नाळ’ चित्रपटाच्या निर्मितीसोबत अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. या चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा नागराज मंजुळे स्वत:चीच निर्मिती असलेल्या ‘घर बंदूक बिर्याणी’ या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
‘घर बंदूक बिर्याणी’ चित्रपटातील भूमिकेबद्दल नागराज मंजुळे सांगतात, ‘‘अभिनयाची आवड आधीपासूनच होती; पण छोटेखानी भूमिकेतून ती आवड जपत होतो. मात्र, ‘नाळ’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा चांगली भूमिका करावीशी वाटत होती आणि या चित्रपटातील वेगळी भूमिका वाटय़ाला आली. खरं तर ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटात सयाजी शिंदे साकारत असलेली डाकूची भूमिका मी करावी असा प्रस्ताव आला होता. मात्र, या भूमिकेसाठी सयाजी शिंदेच योग्य ठरतील असे मलाही वाटले आणि त्यांनी या चित्रपटात डाकूची भूमिका साकारली. मी या चित्रपटात प्रेक्षकांना पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.’’
अभिनेते सयाजी शिंदे यांनी आजवर मराठी, हिंदीसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात पुन्हा एकदा ते वेगळय़ा भूमिकेत दिसणार आहेत. सयाजी शिंदे हे उत्तम नट तर आहेतच; पण एक व्यक्ती म्हणूनही ते उत्तम आहेत, अशा शब्दांत मंजुळे यांनी सयाजी शिंदेंचे कौतुक केले. इतकी वर्षे या क्षेत्रात काम करत असूनही सयाजी यांना किंचितही अहंकार नसल्याचे मंजुळे यांनी सांगितले. हरहुन्नरी अभिनेते सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि ‘सैराट’ फेम आकाश ठोसर अशी वेगळीच जोडी प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘गुन गुन’, ‘आहा हेरो’ अशी श्रवणीय गाणी चित्रपटात असून या गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे.
‘झी स्टुडिओज’ आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटाचे कथानक पोलीस आणि डाकू यांच्याभोवती फिरताना दिसते आहे. हेमंत जंगल अवताडे यांचे दिग्दर्शन असलेला ‘घर बंदूक बिर्याणी’ हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.