रेश्मा राईकवार
बंदा जिंदा हो तो नजर आना जरुरी है.. असा संवाद ‘जवान’ चित्रपटातील एका गाण्याच्या सुरुवातीला शाहरुख खानच्या तोंडी आहे. या संवादाला पुरेपूर जागत हिंदी चित्रपटसृष्टीत शाहरुख खान नावाचा बंदा अजूनही तितकाच दमदार आहे, त्याचं नाणं अजूनही खणखणीत वाजतं आहे याची प्रचीती दिग्दर्शक अॅटली यांनी ‘जवान’च्या निमित्ताने दिली आहे. प्रेक्षकांची नस अचूक ओळखलेल्या अॅटली यांनी अॅक्शन, गाणी, कडकडीत संवाद आणि शाहरुख खान नावाचा करिश्मा असं सगळं एकात एक गुंफून उत्तम मसाला मनोरंजन असलेला चित्रपट दिला आहे. आणि शेतकरी आत्महत्यांपासून व्यवस्थेतील भ्रष्टाचार ते मतदान करताना विचारपूर्वक उमेदवार निवडा अशा मुद्दय़ांवर ठासून भाष्य करण्याची संधीही अॅटली यांनी सोडलेली नाही.
‘जवान’ चित्रपट पाहताना तो पूर्णत: दाक्षिणात्य शैलीतील काहीसा तडकभडक आणि अतिरंजित मांडणीचा आहे हे लक्षात घ्यायला हवं. पण त्याचं प्राथमिक स्वरूप उथळ मनोरंजन या पद्धतीचं असलं तरी चित्रपटाचा नायक शाहरुख खान आहे हे लक्षात घेत अॅटली यांनी संयत आणि हुशारीने मांडणी केली आहे. त्यामुळे ‘जवान’ हा पठडीबाज दाक्षिणात्य चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणाऱ्या मनमोहन देसाईंच्या चित्रपटांची अधिक आठवण करून देतो. शाहरुख खान इथे अॅक्शन हिरो आहेच, तो प्रेमपटांचा बादशाह असल्याने इथे त्याला दोन दोन नायिका आहेत, अर्थात त्याचे संदर्भ वेगळे आहेत. अॅक्शन हिरोला साजेशी वेगवान कथा असल्याने प्रणयी संवाद वा गाण्यांमध्ये दिग्दर्शकाने नायकाला फारसं गुंतवलेलंही नाही. सामान्य चेहऱ्याचा तरीही शैलीदार, रुबाबदार रांगडा नायक, त्याची तत्त्वं, देशभक्ती आणि त्याच्या या स्वभावामुळे त्याच्याशी जोडली जाणारी निष्ठावान लोकांची मांदियाळी.. या पायावर चित्रपटाचं कथानक रचण्यात आलं आहे. एरव्ही नायकाबरोबर सहनायक असतात, इथे सगळय़ाच नायिका आहेत. नारीशक्तीला एकत्र घेऊन लढणारा नायक या चित्रपटाच्या निमित्ताने मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळतो आहे.
नायकाला प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या चित्रपटात अनेकदा ठरावीक छापाच्या कथा केंद्रस्थानी असतात. इथे त्या कथांना जोडलेले संदर्भ ताजे आणि आत्ताच्या समस्यांवर थेट भाष्य करणारे आहेत हे विशेष. बँकांकडून मोठमोठी कर्ज चुटकीसरशी मिळवून पैसे बुडवणारे गर्भश्रीमंत उद्योजक आणि काही हजारांच्या रकमेचं कर्ज चुकवता येत नाही म्हणून आत्महत्येचा फास जवळ करणारे शेतकरी हा व्यवस्थेतला विरोधाभास, सरकारी रुग्णालये अद्ययावत वैद्यकीय सोयीसुविधांनी सुसज्ज आहेत असं छातीठोकपणे खोटं सांगणारे आणि प्रत्यक्ष रुग्णालयात सोयी नाहीत म्हणून मृत्युमुखी पडणाऱ्यांची जबाबदारी तेथील डॉक्टर-अधिकाऱ्यांवर टाकत त्यांचा बळी घेणारी व्यवस्था अशा कित्येक समस्यांकडे दिग्दर्शक लक्ष वेधत जातो. आणि राजकीय इच्छाशक्ती असेल तर पाच तासांत व्यवस्थेत बदल होऊ शकतो हे दिग्दर्शक नायकाच्या तोंडून ठणकावून सांगतो. सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठीच्या शस्त्रास्त्र खरेदीमध्ये होणारा भ्रष्टाचार, पूर्वेकडच्या राज्यातील हिंसाचार ते मतदानाचे कर्तव्य बजावताना विचारपूर्वक निवड करण्याचे कळकळीचे आवाहन असे एकापेक्षा एक विषय एकाच चित्रपटात दिग्दर्शकाने पेरले आहेत. त्यातले गांभीर्य टिकवून पुरेशी रंजक मांडणी केली असल्याने हा चित्रपट कुठेही रटाळ होत नाही.
दिग्दर्शक स्वत: शाहरुख खानचा चाहता आहे, त्यामुळेच की काय त्याची वैशिष्टय़े चित्रपटात खुबीने त्याने पेरली आहेत याची जाणीव होते. शाहरुख खानची जेवढी रूपं पडद्यावर दिसतात त्या प्रत्येकाचं वेगळेपण जपण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात आला आहे. आता यात शाहरुखच्या नक्की किती भूमिका आहेत हे खरंतर पडद्यावरच पाहण्यात मजा आहे. पण त्याला देण्यात आलेले लूक, त्याच्या कपडय़ांच्या निवडीपासून देहबोलीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर तपशिलात काम करण्यात आले आहे हे पडद्यावर पाहताना जाणवते. त्याच्या प्रवेशासाठी देण्यात आलेली खास धून, संगीतकार अनिरुद्ध रवीचंद्रची खास उडत्या ठेक्यातली गाणी आणि त्यापद्धतीचं जोशपूर्ण नृत्यदिग्दर्शन अशी प्रत्येक गोष्ट चित्रपटात जमवून आणली आहे. अॅटलीने केलेल्या या मांडणीत फिट बसण्यासाठी अभिनेता शाहरुख खानने हरएक मेहनत घेतली आहे. त्याच्या दिसण्यापासून अभिनयापर्यंत अॅक्शन हिरोचा बाज आणि सूर त्याने सहजतेने पकडून ठेवला आहे. काही प्रसंगात त्याच्या चेहऱ्यावरचं वय दिसत असलं तरी याही वयात अॅक्शन हिरो म्हणून प्रेक्षकांसमोर उभं राहताना त्याने कोणतीही कसर ठेवलेली नाही. दीपिका पदुकोणची छोटेखानी लक्षवेधी भूमिका, नयनताराने साकारलेली कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, विजय सेतुपतीचा खमका खलनायक आणि सहा नायिकांच्या भूमिकांमध्ये असलेल्या सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओकपासून सगळय़ा सहअभिनेत्री हा सगळा तामझाम ‘जवान’ चित्रपटात उत्तम जमून आला आहे. प्रेक्षकाला स्वप्निल कथेत गुंतवून का होईना आपल्याला जे म्हणायचं आहे ते थेट पोहोचवता येतं हे ओळखून केलेला अॅटलीचा ‘जवान’ प्रेक्षकांचं घटकाभर मनोरंजन करण्यात पुरेपूर यशस्वी ठरला आहे.
जवान
दिग्दर्शक – अॅटली
कलाकार – शाहरुख खान, नयनतारा, दीपिका पदुकोण, विजय सेतुपती, प्रियमणी, सान्या मल्होत्रा, गिरिजा ओक, आलिया कुरेशी, संजीता भट्टाचार्य, लेहर खान, सुनील ग्रोव्हर.