वर्षानुवर्षे साचलेल्या भावनांचा, गैरसमजांचा कोंडमारा व्हायला लागला की अगदी जिव्हाळ्याची नातीही कोंडवाड्यागत वाटू लागतात. गैरसमजांची जळमटं दूर झाली तरच त्या नात्यांना नव्याने श्वास घेता येतो. मग ते नातं पती-पत्नीचं असो वा सासू-सून, मैत्रिणींमधले वाद… कोणत्याही नात्याचा नव्याने श्रीगणेशा झाला तर आयुष्याची दिशा निश्चितच बदलू शकते, हे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या थोड्या उठावदार शैलीत सांगणारा चित्रपट म्हणजे ‘श्री गणेशा’.
‘टकाटक’, ‘एक नंबर’, ‘येड्यांची जत्रा’ यांसारख्या चित्रपटांमधून सतत तरुण पिढीला केंद्रस्थानी ठेवत विशेषत: प्रौढ विनोदी आशयांच्या चित्रपटावर भर देत आल्यामुळे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचा बाज, त्यांचे चित्रपट एका ठरावीक साच्यात गणले जातात. त्यांच्या चित्रपटांचा स्वत:चा प्रेक्षकवर्ग आहे, मात्र कौटुंबिक मनोरंजनात्मक आशय धुंडाळणारे प्रेक्षक अनेकदा चटकन या चित्रपटांकडे वळत नाहीत. ‘श्री गणेशा’ हा एका अर्थी त्यांनी त्यांच्या ठरीव साच्यातून बाहेर पडत केलेला एक वेगळा प्रयत्न आहे, असं म्हणता येईल.
या चित्रपटात लेखक-दिग्दर्शकाने पहिल्यांदाच वडील आणि मुलाच्या नात्यातील ताणेबाणे हा विषय रंगवला आहे. या नात्याला कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर कडवटपणाचा स्पर्श होतोच. आई आणि मुलाचं नातं जितकं सहज, दृढ असतं, तसंच वडिलांचं नातंही असेलच असं अनेकांच्या बाबतीत शक्य होत नाही. वडिलांना कुठे समजतात आपल्या भावना… त्यांना त्यांचंच म्हणणं खरं करायचं असतं. त्यांना कुठे काय कळतं? हा प्रश्न तरुण वयातील मुलांच्या मनात पिंगा घालत असतो. तर आपल्या चपला मुलाच्या पायात यायला लागल्या… तरी त्याला शहाणपण कधी येणार? हा प्रश्न बापाचं काळीज कुरतडत असतो. एकमेकांविषयीच्या भावना, विचार कधी सांगितलेच न गेल्यामुळे त्यांच्यातील नात्यांचा गुंता सुटता सुटत नाही. ताण अधिकच वाढत जातो आणि विसंवादाशिवाय हाती काही येत नाही. ‘श्री गणेशा’मध्ये बालसुधारगृहात असलेल्या टिकल्याच्या मनातही असाच बापाविषयी राग आहे. वडिलांनी आपल्याला बालसुधारगृहात पाठवलं, त्यांच्यामुळे आयुष्याचा खेळखंडोबा झाला याचा राग त्याच्या मनात आहे. टिकल्याचे वडील भाऊसाहेब पाटील मनाने खूप चांगले आहेत. टिकल्याला वेळीच शिक्षा केली नाही तर त्याचं आयुष्य वाया जाईल, म्हणून त्याला बालसुधारगृहात पाठवणारे भाऊसाहेब दोन वर्षांनी त्याला पुन्हा एकदा घरी घेऊन जायला येतात. बालसुधारगृह ते गावी आपल्या घरी पोहोचेपर्यंतचा या दोघा बापलेकाचा प्रवास, त्यांच्यात होणारा संवाद, घडणाऱ्या घटना या सगळ्यातून त्यांचं नातं अंतर्बाह्य बदलून जातं. एकाअर्थी या नात्याच्या प्रवासाची गोष्ट या चित्रपटात रंगवण्यात आली आहे.
हेही वाचा >>>Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
‘श्री गणेशा’ या चित्रपटाचा कथाविषय आणि तो मांडण्यासाठी शशांक शेंडे यांच्यासारख्या उत्तम कलावंताची निवड या दोन्ही गोष्टींबाबतीत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी केलेला विचार फळला आहे. शशांक शेंडे यांची अभिनय शैली ही पूर्णत: भिन्न आहे. उठावदार चित्रपटांच्या वाट्याला ते फारसे गेलेले नाहीत. सहज, तरल अभिनय हे त्यांचं वैशिष्ट्य. कवडे यांची दिग्दर्शन शैलीच नव्हे तर इथे त्यांच्या मुलाच्या भूमिकेत असलेल्या प्रथमेशचीही अभिनयाची पद्धत वेगळी. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने शशांक शेंडे, प्रथमेश परब आणि छोटेखानी भूमिकेत का होईना संजय नार्वेकर अशा अभिनयाच्या तीन वेगळ्या तऱ्हा असलेल्या कलाकारांचा एकत्र अभिनय पाहण्याची संधी दिग्दर्शकाने दिली आहे.
प्रथमेश आणि मिलिंद कवडे या कलाकार-दिग्दर्शक जोडगोळीने बऱ्यापैकी एकत्र काम केलेलं आहे. तरी या चित्रपटात प्रथमेशने त्याच्या परिचित शैलीपेक्षा वेगळ्या पद्धतीने अभिनय केला आहे हे लक्षात येतं. टिकल्या म्हणून त्याच्या लुकपासून देहबोलीपर्यंत त्याने ठळकपणे फरक जाणवेल, अशा पद्धतीने काम केलं आहे. विशेषत: शशांक शेंडे आणि प्रथमेश यांच्यावरच बराचसा भाग चित्रित झाला असल्याने त्यांनी परस्परपूरक अशा पद्धतीने काम केलं आहे, त्यामुळे बापलेकाची ही जोडी आपल्यातली वाटते. चित्रपटात विनाकारण प्रेमकथा घुसडण्याचा प्रयत्नही दिग्दर्शकाने केलेला नाही. तेवढा आयटम साँगचा मोहही टाळता आला असता तर चित्रपट आणखी चांगला वाटला असता. तरीही दिग्दर्शकाने त्यांच्या नेहमीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा विषय घेत केलेला नव्या मांडणीचा हा चित्रपट पाहायला हवा.
श्री गणेशा
दिग्दर्शक : मिलिंद कवडे
कलाकार : प्रथमेश परब, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, मेघा शिंदे