मराठी सिनेमा जागतिक पातळीवर गौरविला जात असून निरनिराळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतोय. याच पार्श्वभूमीवर आशयघन मराठी चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय स्तरांवर सन्मान करणारा ‘इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल’ IMFF येत्या २० जून ते २४ जून या कालावधीत मॉरिशसमध्ये रंगणार आहे. ‘शार्दुल क्रिएशन्स’ आणि  ‘आर. आर. ग्रुप’ चे आयोजन असलेल्या या सोहळ्याचे पडघम आता निनादू लागले असून त्याविषयीची उत्सुकता सिनेवर्तुळात पहायला मिळतेय. मॉरिशसला होणाऱ्या सोहळ्यापूर्वी मुंबईमध्ये १२ दर्जेदार चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येतोय.
प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरच्या मुख्य सभागृहात २५ ते २७ मे या तीन दिवस रंगणाऱ्या या महोत्सवात दिवसाला ४ सिनेमांचा आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. यावेळी सिनेमांचे निर्माते- दिग्दर्शक व कलाकार देखील उपस्थित राहणार असून या महोत्सवाला सर्वांना प्रवेश विनामुल्य आहे.  IMFF च्या या चित्रपट महोत्सवात ‘टाईमपास’, ‘दुनियादारी’, ‘रेगे’, ‘आजचा दिवस माझा’, ‘सत ना गत’, ‘फँड्री’, ‘यलो’, ‘सामर्थ्य’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘झपाटलेला २’ ‘भाकरखाडी ७ किमी’, ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या निवडक १२ चित्रपटांचा समावेश असून यामधून ८ चित्रपटांची निवड करण्यात येणार आहे. निवडण्यात आलेल्या या सिनेमांचे स्क्रिनिंग मॉरिशसमध्ये २० जून ते २४ जून या कालावधीत करण्यात येईल. ‘इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल’च्या निमित्ताने तमाम मराठी रसिकांना दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद घेता येणार असून हा महोत्सव एक वेगळा अनुभव ठरणार आहे.
मॉरिशस येथे होणाऱ्या सोहळ्यातील कार्यक्रमांची जय्यत तयारी सध्या सुरु असून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकार यात सहभागी असणार आहेत. तत्पूर्वी सिनेरसिक मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला उपस्थित राहून चित्रपटांचा आस्वाद घ्यावा यासाठी आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International marathi film festivals marathi movie festival