आज ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. महिलांचे कर्तृत्व आणि सामर्थ्याचा सन्मान करण्याचा हा दिवस. या दिवशी विविध ठिकाणी महिला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सध्या सोशल मीडियावर अनेक कलाकार जागतिक महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा देताना दिसत आहे. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत ‘अंगूरी भाभी’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रेनेही महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून अंगूरी भाभीजी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रे ही घराघरात प्रसिद्ध आहे. या मालिकेत एका सालस, निरागस आणि भोळ्या भाबड्या पत्नीची भूमिका साकारत तिने प्रेक्षकाचं भरभरून मनोरंजन केलं आहे. नुकतंच महिला दिनाच्या निमित्ताने अँड टीव्हीवरील प्रमुख नायिकांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच त्यांनी आलेले काही चांगले वाईट अनुभवही सांगितले.
यावेळी अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे म्हणाली, ‘”महिला आणि माता असल्यामुळे मी माझ्या मुलीसाठी कोणत्याही पूर्वाग्रहापासून मुक्त आणि संधींनी भरलेले वातावरण निर्माण केले आहे. यामुळे ती मुक्त, प्रबळ, उत्साहित होईल आणि इतर महिलांना देखील उत्साहित करेल. पण दुर्दैवाने समाजाच्या सर्वच विभागांमध्ये असे घडत नाही, यासाठी अशा प्रकारची जागरूकता महत्त्वाची आहे.”
“आपण वेळ काढून आपल्या मुलांसोबत आणि मोलकरणीसोबत लैंगिक पूर्वाग्रहांबाबत नियमितपणे चर्चा केली पाहिजे. यामुळे त्यांना समजण्यास, प्रत्युत्तर देण्यास आणि संदेश पसरवण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मला एवढेच सांगावेसे वाटते की आपण पुरूषांप्रमाणे समान दर्जा मिळवण्यासाठी लांबचा पल्ला गाठला आहे. आपण आपल्या क्षमतेनुसार आणि आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये सक्षम बनलो आहोत. आपण या बाबींना आत्मसात करून ते प्रशंसित केले पाहिजे. सर्वोत्तम बनण्यासाठी आपल्या सर्व क्षमतांचा वापर केला पाहिजे. महिला दिनाच्या आनंदमय शुभेच्छा”, असेही शुभांगी अत्रेने म्हटले.
शुभांगीने ‘कस्तूरी’, ‘दो हंसों का जोडा’ आणि ‘चिड़िया घर’ या मालिकेतही काम केलं आहे. शुभांगी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सध्या शुभांगी ही ‘भाभीजी घर पर है’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत ‘अंगुरी भाभी’ हे पात्र साकारत आहे.