‘पिकू’ चित्रपटाची कथा वृद्ध वडिलांची काळजी घेत आपले दैनंदिन वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य जगणाऱ्या दिल्लीस्थित मुलीची कहाणी आहे. यातील ‘पिकू’ आहे दीपिका पदुकोण आणि तिच्या वडिलांची भूमिका साकारली आहे अमिताभ बच्चन यांनी. चित्रपटात दीपिकाची दैनंदिन जीवन जगतानाची ओढाताण अनुभवायला मिळणार आहे. चालू जमान्यातील दिल्लीस्थित ‘वर्किंग गर्ल’ असलेली ‘पिकू’ केवळ आपले घरच चालवत नाही, तर सतत कशानाकशाची मागणी करणाऱ्या आपल्या वडिलांची काळजी घेत वैयक्तिक आणि व्यावसायिक आघाडीवर योग्य ताळमेळ घालताना दृष्टीस पडेल. ‘पिकू’विषयी बोलताना दिग्दर्शक शुजित सिरकर म्हणाले, ‘पिकू’ अन्य स्वावलंबी मुलींप्रमाणेच एक आहे. जी कुठलीही तडजोड न करता काम करते, स्वत:चा व्यवसाय चालवते, जीवनात पुढच्या क्षणी काय होईल याची जिला चिंता सतावत नाही आणि या दिल्लीसारख्या सर्वधर्मिय शहरात ती आपल्या वृद्ध पित्याची देखभाल करते. या चित्रपटाच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाची सफर घडविण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखांबरोबर त्यांच्या जीवनाची सांगड घालत, चित्रपटातील पात्रांवर येणाऱ्या प्रसंगांशी निगडीत करण्याचा प्रयत्न केला असल्याच ते म्हणाले. वडील आणि मुलगी यांच्या अनोख्या नात्यातील चढउतारांनी भरलेला प्रवास म्हणजे ‘पिकू’ चित्रपट आहे. ज्यात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘एमएसएम मोशन पिक्चर्स’ने ‘सरस्वती एन्टरटेन्मेंट क्रिएशन’ आणि ‘रायझिंग सन फिल्म्स’च्या संयोगाने तयार केलेला ‘पिकू’ चित्रपट ८ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा