बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता शाहरुख खान सध्या आयपीएलमधील त्याच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्यन, सुहाना आणि अबराम या त्याच्या तिन्ही मुलांसह कोलकाता शहरात आहे. माझी मुले या सगळ्याचा खूप आनंद घेत असून यानिमित्ताने त्यांना जिंकण्यातील आणि हारण्यातील मुल्य कळत असल्याचे शाहरूखने सांगितले.
माझ्या मुलांनी खेळाचा आनंद लुटावा इतकीच माझी इच्छा आहे. मी या खेळावर आणि आयपीएलवर प्रेम करतो. आज माझी मुले माझ्याबरोबर आली आणि त्यांना जिंकण्याचे आणि हारण्याचे खरे मुल्य कळाले, यासाठी मी खूप आनंदित आहे. हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. आजची रात्र विजयाची होती… ती असायलाच हवी होती, असे शाहरूखने ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटले आहे.
आयपीएल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बुधवारी शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्स संघावर ७ गडी राखून मात केली. हा सामना संपल्यानंतर शाहरूखचा सर्वात लहान मुलगा अबराम ईडन गार्डन्सवर इकडे-तिकडे धावताना दिसला. मी माझ्या तिन्ही मुलांना इकडे आणल्यानंतर निराश करू शकत नव्हतो. आजची रात्र आमच्यासाठी खास होती. कारण, आम्ही सगळे एकत्र होतो. मी केकेआरच्या यापुढे होणाऱ्या सर्व सामन्यांना हजेरी लावणार असल्याचे शाहरुखने सांगितले. केकेआर संघासाठी मी आता निव्वळ एक चेहरा आहे. तर माझी तिन्ही मुले केकेआर संघाच्या चिअरलीडर्सची भूमिका बजावत असल्याचेही शाहरूखने मिश्कीपणे सांगितले. आपल्या संदेशात शाहरूख खानने कोलकातावासीयांनी आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले. मला सर्वात जास्त प्रेम देणाऱ्या कोलकता शहराची ओळख छोट्या अबरामला सर्वप्रथम करून द्यावी असे मला वाटले. येथील लोकांचे प्रेम किती निर्व्याज्य आहे, याची ओळख त्याला करून द्यायची होती, असे शाहरूखने म्हटले आहे.

srkabramml