अभिनेत्री प्रिती झिंटाने विनयभंगाच्या केलेल्या तक्रारीप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुरुवारी आयपीएलचे अध्यक्ष सुंदर रमण यांच्यासह सहा जणांचा जबाब नोंदविला.
प्रिती झिंटाने नेस वाडिया (४४) याच्यावर ३० मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये शिविगाळ करून विनयभंग केल्याची तक्रार दिली होती. संघाच्या कर्मचाऱ्यासमोर, बसण्याच्या जागेवर तसेच सामना संपल्यानंतर मैदानात अशा एकूण तीन ठिकाणी हा प्रकार घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. या दिवशी सर्वाधिक म्हणजे ३७ हजार प्रेक्षक मैदानात होते. हा वाद झाल्यानंतर प्रितीने मला या घटनेबद्दल सांगितले होते अशी माहिती रमण यांनी पोलिसांना दिली आहे. जबाब घेतलेल्यांपैकी अनेकांनी या वादाला पुष्टी दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. प्रितीच्या जबाबात अनेक संदिग्ध प्रश्न असून त्यासाठी तिचा पुरवणी जबाब नोंदविला जाणार आहे.
..तो नेस वाडिया नव्हे
प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यात झालेल्या वादानंतर वृत्तवाहिन्यांनी प्रितीसोबत एक इसम वर्तुळ करून दाखविला होता. हा इसम नेस वाडिया असल्याचा दावा वृत्तवाहिन्यांनी केला होता. परंतु हा इसम नेस वाडिया नसून बीसीसीआयचा पदाधिकारी अंकित बाल्दी असल्याचे पोलिसांनी सांगितले. खुद्द अंकितनेच पोलिसांना हे सांगितले. वानखेडे स्टेडियममधील सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या सोनी टीव्हीचे १९ कॅमेरे आहेत. त्या सर्वाचे सीसीटीव्ही चित्रण पोलीस तपासत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा