गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भारतात येण्यास चित्रपट निर्माता- दिग्दर्शक रेझा डोर्मिशियान यांच्यावर इराणने बंदी घातली आहे. त्यांची निर्मिती असलेल्या ‘अ मायनर’ या चित्रपटाचं गोव्यात होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये स्क्रिनिंग होणार होतं. मात्र या निर्मात्याला भारतात येण्यास इराणच्या अधिकाऱ्यांकडून बंदी घालण्यात आली आहे.
‘व्हरायटी’ने दिलेल्या वृतानुसार, शासनविरोधी मत व्यक्त केल्यामुळे इराणी राजवटीच्या निर्बंधांना सामोरा जाणारा तो इराणी चित्रपटसृष्टीतील चौथा व्यक्ती आहे. त्याआधी आणखी तीन व्यक्तींवर इराणने बंदी घातली आहे. दरियुश मेहरजुई यांनी ‘अ मायनर’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी इफ्फीकडून रेझा डॉर्मिशियन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यांना इराण सरकारकडून देश सोडण्याची परवानगी मिळाली नाही असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. डॉर्मिशियन यांचा पासपोर्ट विमानतळावर काढून घेण्यात आला, असंही त्यात म्हटलं आहे. त्यांच्या ‘अ मायनर’ चित्रपटाचं स्क्रिनिंग गुरुवारी आणि शुक्रवारी म्हणजे २४ आणि २५ नोव्हेंबरला करण्यात आलं.
‘अ मायनर’ हा चित्रपट एका अशा महिलेची कथा आहे. जिचे विचार स्वतंत्र आहेत आणि तिला संगीत शिकण्याची इच्छा आहे पण ती पतीच्या पुराणमतवादी विचारांमध्ये अडकलेली आहे. दरम्यान चित्रपट निर्मात्याच्या जवळच्या सूत्रांनी दावा केला आहे की, निर्मात्यावर खटला चालवला जाणार असून त्यासाठी त्याला न्यायालयात पाठवण्यात आलं आहे. मात्र रेझा डॉर्मिशियन यांना पोलिसांनी अटक केली होती का किंवा त्याच्यावर कोणते आरोप लावण्यात आले आहे हे अद्याप समजलेलं नाही.
डॉर्मिशियन यांनी मागच्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावरून इराण सरकारवर टीका केल्याने त्यांना अशाप्रकारे भारतात येण्यास रोखण्यात आल्याचंही बोललं जात आहे. डॉर्मिशियन यांनी इराणमध्ये सुरु असलेल्या हिजाबविरोधी देशव्यापी आंदोलनादरम्यान त्यांच्या इन्स्टाग्रामवरून बऱ्याच पोस्ट शेअर केल्या होत्या. सप्टेंबरमध्ये महसा अमिनी या २२ वर्षीय कुर्दिश महिलेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये खळबळ उडाली. महिलांसाठी असलेल्या हिजाबसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिला तेहरानमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर इराणध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटलं आहे.
दरम्यान आतापर्यंत इराणने तीन चित्रपट निर्मात्यांना देश सोडण्यास मनाई केली आहे. ऑक्टोबरमध्ये, इराणी चित्रपट निर्माते मानी हाघिघी हे बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्यासाठी विमानात बसणार असताना, विमानतळावर त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. मानी हाघिघी यांच्या चित्रपट ‘सब्सट्रॅक्शन’चा या फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार होता. तसेच नोव्हेंबरच्या सुरुवातीला डॉक्युमेंट्री फिल्म ‘सायलेंट हाऊस’चा नेदरलँड्समधील IDFA येथे वर्ल्ड प्रीमियर होता, तेव्हा सह-दिग्दर्शक फर्नाझ आणि मोहम्मदरेझा जुराबचियन यांनाही देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली.