सकाळी उठणं, घडय़ाळाच्या काटय़ागणिक नित्याची कामे आटपून लोकल गाठणं, लोकलमधली तीच गर्दी आणि त्या गर्दीत कधी तरी तुमच्या वाटय़ाला येणारी चौथी सीट, त्यातच आनंद मानून समाधानानं कार्यालयात पोहोचणं.. या नेहमीच्या एका दुष्टचक्रात अडकलेला सामान्य माणूस. त्याच्यावरच्या या ताणांचा जेव्हा कडेलोट होतो तेव्हा तो काय करू शकतो? माधव आपटेच्या रूपाने ‘डोंबिवली फास्ट’मधून सर्वसामान्यांची व्यथा पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर उतरवणारा दिग्दर्शक म्हणून निशिकांतची ओळख आजही कायम आहे. मात्र त्यानंतर कित्येकदा माधव आपटेसारख्याच व्यक्तिमत्त्वांच्या कथा समोर यायला लागल्यानंतर त्यांना बाजूला सारून कधी ‘फोर्स’, कधी ‘लय भारी’, ‘दृश्यम’ अशी आपली वाट निशिकांतने नेहमी बदलती ठेवली. इरफान खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘मदारी’ या सायकोथ्रिलर चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा दिग्दर्शक म्हणून आपले कौशल्य सिद्ध करणार आहे.
मला स्वत:ला कुठलाही फॉर्म ऑफ सिनेमा चुकीचा वाटत नाही. अमुक एकच फॉर्मचा चित्रपट चांगला असं काही माझ्या मनात नाही. त्यातही माझं स्वत:चं असं एक बोअरडम आहे. म्हणजे मी सुरुवात केली ‘डोंबिवली फास्ट’ने जो वास्तवाला धरून केलेला चित्रपट होता. मग ‘मुंबई मेरी जान’ केला तोही वास्तव घटनेवरचा होता. ‘फोर्स’ केला आणि मग एक तद्दन व्यावसायिक चित्रपट करायचा म्हणून मग मी मराठीत ‘लय भारी’ केला. ज्यासाठी समीक्षकांनी माझ्यावर टीका केली आणि आजही करतात, निशिकांत कामत हसत हसत सांगतो. पण ‘लय भारी’च्या वेळी मी माझ्या मनाची तयारी केली होती. मला व्यावसायिक चित्रपटच करायचा होता. त्यानंतर थोडा आशयात्मक आणि तरीही व्यावसायिक म्हणून मग ‘दृश्यम’ केला. आणि खूप अ‍ॅक्शन करायची इच्छा निर्माण झाली होती म्हणून मग ‘रॉकी हँडसम’ केला, असं सांगितल्यावर तो स्वत:च पुन्हा एकदा हसतो. जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आपटला. सहा चित्रपटांनंतर ‘रॉकी हँडसम’ हा पहिला चित्रपट आहे जो चांगला चालला नाही, असे तो म्हणतो. पण म्हणून आपण प्रयोग करणं थांबवणार नाही हेही तो निक्षून सांगतो.
‘लय भारी’ला समीक्षकांकडून पसंती मिळाली नाही. तुम्हाला व्यावसायिक यश आणि समीक्षकांची पसंती या दोन्ही गोष्टी एकाच चित्रपटासाठी मिळत नाहीत. पण ‘लय भारी’बद्दल समीक्षकांचं जे मत आहे ते आपल्याला मान्य असल्याचं तो सांगतो. समीक्षकांचा मला नेहमीच आदर वाटतो. कारण त्यांनीच ‘डोंबिवली फास्ट’च्या वेळी आणि नंतरही मला उचलून धरलं. त्यामुळे जर त्यांना मी ‘लय भारी’ केलेला आवडला नसेल तर मी त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. ‘मदारी’ हा खऱ्या अर्थाने ‘डोंबिवली फास्ट’सारख्या जॉनरचा चित्रपट मिळाल्याचं त्याचं म्हणणं आहे.
‘मदारी’ ही एक वडील आणि मुलाच्या नात्याची कथा आहे. मात्र अत्यंत भावनिक गुंतागुंत असलेला असा हा चित्रपट मला आठ वर्षांनी करायला मिळाला. त्यामुळे अशी संधी सहजी सोडणं मला शक्य नव्हतं, असं सांगणाऱ्या निशिकांतची या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून निवड खुद्द इरफानने केली आहे. ‘मदारी’ची कथा ही सुतापाची आहे. सुतापा म्हणजे इरफानची पत्नी. तिची कथा वाचल्यानंतर अशा चित्रपटाची हाताळणी केवळ मीच करू शकतो, या विश्वासाने इरफानने ही कथा आपल्याकडे सोपवल्याचं निशिकांतने सांगितलं.
‘मदारी’ हा एका वास्तव घटनेवरून प्रेरित असा चित्रपट आहे. इरफानशी टेलिव्हिजनच्या दिवसांपासून संबंध आहेत. त्यामुळे त्याने कथा ऐकवल्यावर चित्रपट करायचा हे
नक्की झाले. मात्र सहा महिने मी मला हव्या त्या पद्धतीने पटकथेवर काम केलं. त्या वेळी खरं तर मी ‘लय भारी’चं चित्रीकरण करत होतो. म्हणजे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरू होतं. पण ‘लय भारी’ तेव्हा चित्रीकरणाच्या स्टेजला असल्याने ‘मदारी’च्या कथेवर काम करणं जड गेलं नाही, असं निशिकांत म्हणतो.
‘मदारी’च्या कथेला खूप वेगवेगळे पदर आहेत. एक तर खऱ्या घटनांपासून प्रेरित चित्रपट करताना आपल्याला जसं जग दिसतं तसंच पडद्यावर ते वास्तव पद्धतीने उतरवणं हे आव्हान असतं. खोटा अभिनय करणं सहज शक्य असतं. पण जे जसं घडलं तसं ते समजून करणं हे अवघड असतं. इथे एका पिता-पुत्राची गोष्ट आहे. त्यांच्या नातेसंबंधाची कथा आहे. त्यांच्याबरोबर घडलेली एक शोकांतिका आहे. त्या दुर्दैवी घटनेला बळी पडलेले काही लोक आहेत. आणि शिवाय या चित्रपटाला थ्रिलरचा पदर आहे. त्यामुळे एवढी गुंतागुंतीची पटकथा असलेला हा चित्रपट करणं हे खरोखरच एक आव्हान होतं. हे आव्हान कशा पद्धतीचं होतं हे सांगताना तो २६ जुलैचा पाऊस किंवा लोकलमध्ये झालेल्या स्फोटांच्या घटनांची उदाहरणं सांगतो. या घटनांमध्ये चार पद्धतीने लोक व्यक्त होताना दिसतात. एक जो या घटनांचा दोष देवावर टाकतो, माझ्या नशिबातच ते होतं, असं त्यांचं म्हणणं असतं. दुसरा एक गट असतो तो आपण तिथे गेलो नसतो तर हे झालंच नसतं अशी जर-तरची भाषा करत राहतो. तिसऱ्या प्रकारच्या लोकांना माझ्याच बाबतीत हे का, हा प्रश्न छळत राहतो. मात्र फार कमी लोक असतात जे या घटनांना जबाबदार कोण हे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला जाबही विचारतात. ‘मदारी’चा नायक या गटातला आहे. त्यामुळे कथेतील गुंतागुंत सहज संवादातून लोकांसमोर आणणं ही मोठी जबाबदारी होती, असं निशिकांतने सांगितलं.
आपल्या चित्रपटांमधून सामाजिक संदेश देण्याएवढे आपण मोठे झालेलो नाही. त्यामुळे तसं काही करण्यात रस नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. अशी एखादी घटना घडल्यानंतर काय करायचं हा प्रश्न मला नक्की पडतो. आणि त्या प्रश्नाची मांडणी मी करतो, असं निशिकांत म्हणतो. सत्य घटनेवरती मी कधीच चित्रपट केले नाहीत मात्र वास्तव घटनांवरचे चित्रपट करताना त्याचे तपशीलही दिग्दर्शकाला माहिती असले पाहिजेत, याबद्दल तो आग्रही आहे. ‘मुंबई मेरी जान’ चित्रपटात लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर जर्मनीची फुटबॉल मॅच पाहायला मिळते. कारण या स्फोटानंतर दोनच दिवसांनी ही मॅच झाली होती. हे जे तपशील आहेत ते पेरून गोष्ट मात्र तुम्हाला तुमचीच सांगावी लागते. ते कौशल्य दिग्दर्शकाकडे असायला हवं, असं तो म्हणतो.
‘मदारी’ चित्रपटाशी इरफान खान अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिकांतून जोडला गेला आहे. मात्र आपले इरफानशी किती तरी र्वष संबंध असल्याने कितीही मत-मतांतरे असली तरी एकमेकांबरोबर काम करणं सोपं जातं, असं तो म्हणतो. मात्र इरफानप्रमाणेच रितेश, जॉन आणि आता अजयबरोबरही त्याची चांगली भट्टी जमली आहे. या चौघांचाही स्वभाव खूप वेगळा आहे. त्यामुळे चौघांबरोबर काम करताना मजा येते. आणि ओळखीच्या कलाकाराबरोबर काम करणं जास्त सोपं असतं. शिवाय, चौघांशी सतत चित्रपट करत नसल्याने त्यात नावीन्यही कायम राहतं, असं निशिकांत सांगतो. सध्या त्याने आपली बॉलीवूडची वहिवाट फास्ट केली आहे, मात्र मराठीत काम करायचं झालं तर आपण ‘लय भारी-२’च करू असंही तो मिश्कीलपणे सांगतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrfan and nishikant kamat come together for madaari
Show comments