गेल्या वर्षभरापासून न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर या कर्करोगाशी लढा देत असलेल्या अभिनेता इरफान खानच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तो भारतात परतला असून तो कधी एकदा रुपेरी पडद्यावर झळकतो याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. भारतात परतल्यानंतर इरफान त्याच्या आगामी प्रोजेक्टकडे वळला आहे. ‘हिंदी मीडियम’चा सीक्वल असलेल्या ‘अंग्रेजी मीडियम’च्या चित्रीकरणाला त्याने सुरूवात केली आहे. चित्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर तो पहिल्यांदाच नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आला असून त्याने चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचं राजस्थानमध्ये चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटातील इरफानचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. हा फोटो इरफानने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये इरफान एका मिठाईच्या दुकानाबाहेर उभा राहिला असून, त्याचा लूक चित्रपटाच्या कथानकाविषयी विचार करण्यास भाग पाडत आहे.

अभिनेत्री राधिका मदान या चित्रपटात इरफानच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. तिच्या व्यतिरिक्त करिना कपूर खान या चित्रपटात इरफानच्या पत्नीच्या भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. मात्र याविषयी अधिकृतपणे कोणतीही माहिती स्पष्ट झाली नाही. दरम्यान, राधिकाने शेअर केलेल्या फोटोतून मात्र करिनासुद्धा या चित्रपटाचा भाग असल्याचे संकेत मिळाले आहेत.