‘पानसिंग तोमर’वाला इरफान खान, ‘लंचबॉक्स’वाला इरफान खान, अँग लीच्या ‘लाइफ ऑफ पाय’मध्ये लहानपणी घेतलेला अनुभव सांगणारा तो मोठा पाय म्हणजेच इरफान खान. थोडासा गंभीर- थोडासा मिश्कील स्वभावाचा आणि आपल्या चेहऱ्याने नाही बोलण्याने, अभिनयाने जिंकणारा इरफान खान कलाकार म्हणून ‘हिरो’ पठडीतला नाही. पण त्याच्या कामामुळे तो सध्या दिग्दर्शकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे, इतका की ‘पिकू’मध्ये तो दीपिकाबरोबर रोमान्स करणार आहे, संजय गुप्ताच्या आगामी ‘जझबा’मध्ये तो ऐश्वर्याबरोबर रोमा
‘पिकू’ हा चित्रपट मी केवळ जुही चतुर्वेदी, जी या चित्रपटाची लेखिका आहे तिच्याबरोबर आणि दिग्दर्शक शूजित सिरकारबरोबर काम करायचं म्हणून स्वीकारला होता. ‘विकी डोनर’ची कथा जुहीने लिहिली आहे हे कळलं तेव्हापासूनच तिने लिहिलेल्या कथेवर काम करायची इच्छा होती. ‘पिकू’ची कथाही वेगळी आहे. शूजित सिरकार हा या पिढीतला अत्यंत बुद्धिमान आणि संवेदनशील दिग्दर्शक आहे. त्याची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे पहिल्या चित्रपटापासून आत्तापर्यंत त्याने चार ते पाच चित्रपट केले असतील, त्या प्रत्येक चित्रपटाची मांडणी वेगळी होती. त्याने ‘विकी डोनर’ केला, लगेचच ‘मद्रास कॅ फे’ केला. दरम्यान, त्याने ‘जॉनी वॉकर’सारखा वेगळा चित्रपट बनवण्याचा प्रयत्नही केला. तो यशस्वी झाला नाही. पण तरीही तो प्रयत्न सोडत नाही. म्हणूनच मला त्याच्याबरोबर काम करायचे होते, असे इरफान म्हणतो. तरीही अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान एका फ्रेममध्ये ही कल्पना कधीच केली नव्हती, असं तो म्हणतो. आणि हे होऊ शकलं त्याचं श्रेयही शूजितसारख्या प्रयोगशील दिग्दर्शकांचं आहे, असं तो म्हणतो.
‘पिकू’ चित्रपट करताना बऱ्याच गोष्टींनी मी भारावून गेलो आहे, असं तो म्हणतो तेव्हा त्याच्या भारावण्याची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्यापासून झालेली असते. या वयातही अमिताभ बच्चन यांच्या कामाची पद्धत, त्यांचा सराव थक्क करणारा आहे. अमिताभ यांच्याबरोबर काम करताना मजा आली, तशीच ती दीपिकाबरोबर काम करतानाही आली. दीपिकाचं एक नवं रूप या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांना पाहायला मिळेल, हे मी खात्रीने सांगू शकतो. आपल्या भूमिकांमधून, चित्रपटांमधून सतत नवं काहीतरी शोधण्याची भूक कलाकारांना असते. दीपिकालाही कलाकार म्हणून नवं काहीतरी करण्याची भूक आहे. तिने जे चित्रपट केलेत त्यातून हे जाणवतं. ‘पिकू’ हा तिच्या याच प्रयत्नांचा भाग आहे, असं इरफानला वाटतं. पण मुळात इरफानसारख्या सातत्याने चरित्र व्यक्तिरेखा किंवा तत्सम भूमिका करणाऱ्या कलाकाराबरोबर काम करण्याची तयारी दीपिकाने दाखवली. अगदी ऐश्वर्यानेही ‘जझबा’साठी नायक म्हणून इरफानसारखा सक्षम अभिनेता हवा आहे, अशी मागणी दिग्दर्शकाकडे केली, याचा उल्लेख केल्यानंतर आपण स्वत:ही यावर विचार केल्याचे तो म्हणतो.सध्या इरफान केवळ बॉलीवूडच नव्हे, तर हॉलीवूडमध्येही तो तितकाच लोकप्रिय आहे. ‘लाइफ ऑफ पाय’नंतर इरफानने ‘अमेझिंग स्पायडरमॅन’मध्ये काम केले. आत्ताही तो स्टीव्हन स्पिलबर्गच्या ‘ज्युरासिक वर्ल्ड’मध्ये दिसणार आहे. शिवाय टॉम हँक्सबरोबरच्या त्याच्या चित्रपटाचेही काम लवकरच सुरू होईल. या अशा वेळेचीच कलाकार नेहमी वाट पाहत असतो, असं तो म्हणतो.
आपल्यासाठी भूमिका लिहिल्या जाव्यात, आपल्याबरोबर काम करण्यासाठी दिग्दर्शक स्वत:हून पुढे यावेत, अशी एक वेळ आपल्या आयुष्यात यावी, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. या वेळेची मीही वाट पाहत होतो, अजूनही वाट पाहतो आहे. इतकी वर्षे तुम्ही जे काम केलेलं असतं त्या कामाची ती पावती आहे. मात्र, त्यासाठी मी कधीही लोकांना काय वाटेल याचा विचार केलेला नाही. लोकांचं मनोरंजनच करायचं आहे तर ते वेगवेगळ्या पद्धतीने करणं ही माझीही जबाबदारी असते. मी आजवर माझ्या विचारांनी ते काम करत आलो आहे, असं तो म्हणतो. पण इतक्या चांगल्या हॉलीवूडपटांमध्ये चांगल्या भूमिका करूनही तिथे चित्रपट करून हवा तसा पैसा मिळत नाही, असा त्याचा टीकेचा सूर असतो. मग हॉलीवूडमध्ये एवढं काम करण्याचं कारण काय, असं विचारल्यावर पैशाच्या बाबतीत जे मी म्हणतो ते खरंच आहे, असं तो पुन्हा सांगतो.
हॉलीवूडपटांमध्ये काम करण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे तिथे आव्हानात्मक भूमिका करायला मिळतात, असं इरफान म्हणतो. त्यांच्या कथाविषयात वैविध्य आहे. प्रत्येक चित्रपट करताना त्याच्या मांडणीवर ते तपशीलवार अभ्यास करतात. प्रत्येक चित्रपटामागची विचारसरणी आणि तो करण्याची त्यांची धाटणी बदलती असते. आणि मुळात, त्यांच्या पटकथा या प्रगल्भ असतात. आपल्याकडच्या पटकथांशी त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे तिथे काम करणं हा नित्य नवा अनुभव असतो. कलाकार म्हणून तुम्हाला तो अनुभव हवाहवासा वाटत असतो. शिवाय हॉलीवूडपटांमध्ये काम के ल्यानंतर जगभरात तुमची ओळख निर्माण होते. त्याचा फायदा मायदेशी काम करताना विविध पद्धतीने होत असतो हे तुम्हालाही लक्षात येईल, असं तो म्हणतो. तेव्हा आज ज्या पद्धतीचे चित्रपट त्याच्याकडे येत आहेत ते पाहता त्याचे अनुभवाचे बोल खरेच आहेत, याची प्रचिती येते. मनोरंजनाची व्याख्या बदललेली आहे. तुम्ही अगदीच सुमार मसाला चित्रपट प्रेक्षकांना देऊ शकत नाही. तितकाच एखादा गंभीर विषय हाताळणारा चित्रपट शाळेत शिकवणाऱ्या धडय़ासारखा संथ, फिरवून-फिरवून सांगू शकत नाही. आशय आणि मनोरंजन दोन्हींची सांगड घालणारा चित्रपटच प्रेक्षकांचं मन जिंकू शकतो आणि हेच आपल्या दिग्दर्शकांसमोर मोठं आव्हान आहे, असं पुन्हा पुन्हा सांगतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा