‘स्लमडॉग मिलेनिअर’, ‘लाइफ ऑफ पाय’, ‘द अमेझिंग स्पायडरमॅन’, ‘ज्युरासिक वर्ल्ड’ असे एकामागून एक हॉलीवूडपट करणारा अभिनेता इरफान खान हा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून प्रस्थापित झाला आहे. सक्षम अभिनेता म्हणून त्याची हॉलीवूडमध्येही ओळख निर्माण झाली असून त्याच जोरावर इरफानला अभिनेता टॉम हँक्सबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. डॅन ब्राऊन लिखित ‘इन्फेर्नो’ या कादंबरीवर आधारित हॉलीवूडपटात इरफान खान आणि टॉम हँक्स एकत्र काम करणार आहेत.
हॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या हिंदी कलाकारांमध्ये ओम पुरी, नसीरूद्दीन शहा, अनुपम खेर आणि इरफान खान अशी मोजकीच नावे आहेत. त्यातही ओम पुरी यांनी आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून काम केले आहे. मात्र, आताच्या पिढीत हॉलीवूडच्या मोठय़ा बॅनरबरोबर काम क रून अभिनेता म्हणून आपला प्रभाव पाडण्याची किमया इरफानलाच साधली आहे. अँग लीचा ‘लाइफ ऑफ पाय’, डॅनी बॉयलचा ‘स्लमडॉग मिलेनिअर’, ‘द अमेझिंग स्पायडरमॅन’मधील त्याची भूमिका यांच्याबरोबरच रितेश बात्रा दिग्दर्शित ‘द लंचबॉक्स’ या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून झालेले कौतुक या सगळ्यामुळे हॉलीवूडमध्ये इरफानबद्दल एक चांगली प्रतिमा निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते. ‘इन्फेर्नो’ या आगामी हॉलीवूडपटात इरफान हॅरी सिम्स नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. एका रहस्यमयी संघटनेचा प्रमुख असलेल्या हॅरीच्या भूमिकेत इरफान दिसणार असल्याचे दिग्दर्शक रॉन हॉवर्ड्स यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘इन्फेर्नो’ हा डॅन ब्राऊन यांच्या तिसऱ्या कादंबरीवरचा चित्रपट आहे, ज्यात टॉम हँक्स यांनी साकारलेली ‘रॉबर्ट लँगडन’ ही व्यक्तिरेखा तिसऱ्या रहस्यमयी मोहिमेवर काम करताना दिसेल. याआधी ‘दा व्हिन्सी कोड’ या चित्रपटात टॉम हँक्सनी संकेतशास्त्राचा प्राध्यापक रॉबर्ट लँगडन यांची व्यक्तिरेखा साकारली होती. ‘एंजल्स अँड डेमॉन’मध्ये हीच व्यक्तिरेखा पुढे नेली होती आणि आता ‘इन्फे र्नो’मध्ये रॉबर्ट लँगडन फ्लॉरेन्स ते इस्तंबूल परिसरात मोहिमेवर आहेत. ‘द कोलंबिया पिक्चर्स’ची निर्मिती असलेला ‘इन्फे र्नो’ १४ ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रदर्शित होईल. या वर्षी एप्रिलपासून चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. ‘इन्फेर्नो’च्या आधी या वर्षीच्या जूनमध्ये इरफानचा ‘ज्युरासिक वर्ल्ड’ हा आणखी एक हॉलीवूडपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader