न्यूरोएन्डोक्राईन कर्करोगावर लंडनमध्ये उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खान काही दिवसांपूर्वी भारतात परतला. इरफानच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. तो पुढील आठवड्यापासून ‘हिंदी मीडियम’च्या सीक्वलला सुरूवात करणार आहे अशी चर्चा आहे.

इरफान सध्या राजस्थानमध्ये असल्याचं समजत आहे. राजस्थानमध्येच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. हे चित्रीकरण पुढील आठवड्यापासून सुरू होईल अशी चर्चा आहे. २०१७ साली इरफानचा ‘हिंदी मिडीयम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट खूपच गाजला, विशेष म्हणजे चीनमध्येही या चित्रपटाला खूपच प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या यशानंतर निर्मात्यांनी सीक्वलची घोषणा केली होती. मात्र इरफानची तब्येत अचानाक बिघडल्यानं चित्रपटाचा सीक्वल लांबला.

आता इरफानच्या तब्येतीत सुधारणा झाली असून इरफाननं वेळ न दवडता चित्रीकरणाला सुरूवात करण्याचा ठरवलं आहे. ‘इंग्लिश मीडियम’ नावानं हा सीक्वल येणार आहे. या चित्रपटात इरफानसोबत राधिका मदन आणि करिना कपूर खानची मुख्य भूमिका आहे.

भारतात  परतलेल्या इरफाननं नुकतेच ट्विटरवर चाहत्यांचे आभारही मानले. ‘जिंकण्याच्या प्रयत्नात कुठेतरी आपण स्वत:वर प्रेम करणं विसरून जातो. मात्र कठीण समयी आपल्याला त्याची जाणीव होते. मी माझ्या आयुष्याच्या या वळणावर थांबून मला मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आणि प्रार्थनेमुळे मी लवकर बरा होऊ शकलो’ असं इरफान म्हणाला. कर्करोगावर मात करून इरफान बरा झाला आहे आता त्याला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

Story img Loader