बॉलिवूडचे प्रतिभावंत कलाकार इरफान खान यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. colon infection मुळे इरफान खान यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर इरफान खान भारतात परतले होते. इरफान खान यांनी अलीकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत पत्नीसाठी जगण्याची इच्छा व्यक्त केली होती.
इरफान खान यांनी १९९५ साली सुतापा सिकंदर यांच्याबरोबर लग्न केले. इरफान खान यांच्याप्रमाणे सुतापा यांनी सुद्धा एनएसडीमधून पदवी मिळवली आहे. “सुतापा भक्कमपणे माझ्या पाठिशी उभी आहे. या आजारामधून बाहेर प़डण्यासाठी तिने सतत मला बळ दिले. तिच्यासाठी मला जगायचे आहे” असे इरफान या मुलाखतीत म्हणाले होते.
“सुतापाबद्दल काय बोलू? ती आठवडयाचे सातही दिवस २४ तास माझ्यासोबत होती. तिने माझी भरपूर काळजी घेतली. मी अजून आहे ते तिच्यामुळे, मला जगण्याची संधी मिळाली तर मला तिच्यासाठी जगायचे आहे” असे इरफान खान म्हणाले होते.