अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडच्या निवडक लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. दोघांच्याही लग्नाला आता जवळपास १५ वर्षं झाली आहे. या काळात त्यांच्याकडे नेहमीच आदर्श जोडी म्हणून पाहिलं गेलं. चित्रपट ‘गुरू’ सेटवर सुरू झालेली यांची लग्नापर्यंत पोहोचली. लग्नाआधी अभिषेक आणि ऐश्वर्यानं त्यांच्या सह- कलाकारांसोबत अनेक रोमँटिक सीन दिले आहेत. पण लग्नानंतर ऐश्वर्या, कधी रोमँटिक सीनसाठी काही सल्ला देते का असा प्रश्न अभिषेकाला एका शोमध्ये विचारण्यात आला होता.
अभिषेक बच्चननं काही काळापूर्वीच ‘द बिग बुल’ या त्याच्या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी कपिलनं त्याला चित्रपटातील रोमँटिक सीनबाबत हा प्रश्न विचारला होता. कपिल म्हणाला, ‘ऐश्वर्या मॅडम तुमची बायको आहे आणि बायको एक चांगली परीक्षकही असते. तर कधी असं झालं आहे का की, तुमचा एखादा रोमँटिक सीन ऐश्वर्यानं पाहिला आणि तुम्हाला काही सल्ला दिला की, इथे तु आणखी चांगलं करू शकला असतास किंवा हे जरा जास्तच झालं आहे. असं त्या कधी बोलल्या आहेत का?’
कपिलचा प्रश्न ऐकून सुरुवातीला अभिषेक हसतो आणि मग म्हणतो, ‘मला एक सांग तू तुझ्या बायकोला कधी तुझा शो दाखवतोस का? तर तिने कधी तुला हे सांगितलं आहे का तू निकितासोबत आणखी चांगलं फ्लर्ट करू शकला असतास.’ अभिषेकच्या प्रश्नावर कपिलची बोलती बंद झाली.
अभिषेक म्हणतो, ‘तू कधी तुझा शो तिला दाखवत नसशील ना? तसंच मी सुद्धा ऐश्वर्याला माझे चित्रपट दाखवत नाही. याच कारणामुळे की बायको कधीच अशाप्रकारचा सल्ला देत नाही.’ अभिषेकच्या बोलण्यावर कपिल शर्माचा चेहरा पाहण्यालायक झाला होता.