बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मागच्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. आलियानं लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच प्रेग्नन्सीची गुडन्यूज दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकदा अभिनेत्री करिअरला ब्रेक लागू नये यासाठी लग्नानंतर लगेचच प्रेग्नन्सीचा निर्णय घेणं टाळतात मात्र आलियानं असं केलं नाही. त्यामुळे ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती की काय अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. अशात करण जोहरच्या एका मुलाखतीमुळे आता आलिया खरंच लग्नाआधी प्रेग्नंट होती असं बोललं जात आहे.
आलिया भट्टनं अलिकडेच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने करण जोहरनं तिच्या लग्नाची बातमी जेव्हा त्याला दिली तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती हे सांगितलं. आलिया म्हणाली, “मी जेव्हा त्याला माझ्या लग्नाबाबत सांगायला त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा त्याचा ‘बॅड हेअर डे’ होता. त्याचे केस सेट होत नव्हते आणि तो वैतागलेल्या अवस्थेत डोक्याला हेअर कॅप लावून बसला होता. मी त्याला सगळं काही सांगून झाल्यावर लग्न करणार असल्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. एका हातात कॉफीचा कप घेतलेला करण जोहर माझ्या लग्नाची बातमी ऐकून अक्षरशः रडत होता.”
आणखी वाचा- “आम्ही विमानातच रोमँटिक…” आलियाने सांगितला रणबीरसोबतचा ‘तो’ किस्सा
आलियानं तिच्या लग्नाबाबत सांगितलेला हा किस्सा करण जोहरच्या काही दिवसांपूर्वीच्याच एका मुलाखतीशी फार मिळता जुळता आहे. जेव्हा आलियानं प्रेग्नन्सीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली, त्यानंतर करणने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने आलियाच्या प्रेग्नन्सीची बातमी समजल्यानंतर काय प्रतिक्रिया होती हे स्पष्ट करताना हाच ‘बॅड हेअर डे’चा किस्सा सांगितला होता.
करण म्हणाला होता, “मला आठवतंय त्या दिवशी माझा ‘बॅड हेअर डे’ होता. मी कॅप लावून, हूडी घालून बसलो होतो आणि आलिया माझ्या ऑफिसमध्ये आली होती. तिने मला तिच्या प्रेग्नन्सीविषयी सांगितलं आणि माझी पहिली प्रतिक्रिया ही होती की माझ्या डोळ्यात पाणी आलं. ज्या मुलीला मी माझं बाळं मानतो, तिचं बाळं या जगात येणार असल्याची वेगळाच आनंद होता.” करणच्या या प्रतिक्रियेचा संदर्भ आलियाच्या लग्नाच्या किस्स्याशी जोडून आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती असं बोललं जात आहे.
दरम्यान आलिया भट्टनं २७ जूनला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या प्रेग्नन्सीची माहिती चाहत्यांना दिली होती. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. आलियाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.