ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अध्यक्षपदासाठी बॉलिवूडचे ‘बॅड मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते गुलशन ग्रोवर यांच्या नावाची चर्चा आहे.
गुलशन ग्रोवर यांनी जवळपास ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते अध्यापन करत होते. काही कलाकारांना त्यांनी अभिनयाचं प्रशिक्षण दिलं आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवर गुलशन ग्रोवर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने अनुपम खेर यांची ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. पदभार स्विकारल्याच्या वर्षभरातच त्यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे संस्थेला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचं कारण खेर यांनी यावेळी दिलं. खेर यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. भाजपाच्या जवळ असलेल्या व्यक्तींचीच या पदावर नियुक्ती होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता.
वाचा : स्वाभिमान! ३० दिवसांत २४ मेमो तरी सयाजींनी केला नाही त्याला नमस्कार
केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाकडून अध्यक्षपदाबाबत काही सूचना आलेली नाही, असे स्पष्टीकरण एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी दिलं आहे. अनुपम खेर यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्याही नावाची चर्चा होती.