‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता मालिकेतून काढून टाकण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आता किरण माने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
किरण माने शनिवारी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांना भेटणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता शरद पवार या प्रकरणावर प्रतिक्रिया देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा : हक्काचं काम काढून घेणं ही…; किरण माने प्रकरणावरील समीर विद्वांसचे ट्वीट चर्चेत
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि धनंजय मुंडे यांनी या प्रकणावर प्रतिक्रिया देत किरण माने यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शरद पवार यांची या प्रकरणावर काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये कोणाचेही नाव नव्हते, परंतु त्याचा संबंध भाजप समर्थकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याशी जोडला. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. माने यांच्या मताला विरोध दर्शवणारे अधिक आक्रमक झाले आणि दोन्ही बाजूंनी मर्यादा सोडून संवाद होऊ लागले. समाजमाध्यमांद्वारे त्यांना अनेक धमक्या येऊ लागल्या आणि अशातच त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचे समजले. यामागे राजकीय दबाव असल्याचे वाहिनीतील एका प्रतिनिधीने त्यांना कळवले. राजकीय हस्तक्षेपामुळे काम गमवावे लागल्याचे त्यांनी समाजमाध्यमांवर जाहीर करत या घटनेचा निषेध केला. त्यानंतर त्यांच्या पाठिंब्यासाठी अनेक चाहते एकवटले. राजकीय आणि कला वर्तुळातूनही या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त होतो आहे.