‘कॉफी विथ करण’ या छोट्या पडद्यावर गाजलेल्या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वातील शाहरूख खानच्या अनुपस्थितीबद्दल निरनिराळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. शाहरूख खान आणि सलमानमधील शीतयुद्ध यासाठी कारणीभूत असल्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. चित्रपटनिर्माता आणि शाहरुख खानचा खास मित्र असणा-या करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमाच्या यापूर्वी तिन्ही पर्वांना शाहरुखने हजेरी लावली होती. ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या आणि दुस-या पर्वाची सुरूवात किंग खान याच्यापासूनच करण्यात आली होती. बॉलीवूडमधील प्रसिद्ध व्यक्तींसह अनौपचारिक गप्पांच्या ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात काजोल आणि दुस-या टप्प्यात काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या साथीने शाहरूख अवतरला होता. सलग तीनदा या कार्यक्रमात येणा-या शाहरूखने ‘कॉफी विथ करण’च्या चौथ्या पर्वाकडे मात्र जाणीपूर्वक पाठ फिरविल्याचे बोलले जात आहे. कारण, ‘कॉफी विथ करण’च्या चौथ्या भागाची सुरूवात झाली तीच सलमान खानच्या येण्याने. अशाप्रकारच्या अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमाला ‘सल्लूमियाँ’ने पहिल्यांदाच हजेरी लावल्यामुळे हा भाग चांगलाच गाजला होता. ‘कॉफी विथ करण’चा अखेरचा भाग बॉलिवूड तारका आलिया भट आणि परिणीती चोप्रा यांच्यावर चित्रित झाला असून येत्या रविवारी टेलिव्हिजनवरून हा भाग प्रसारित केला जाणार आहे.

Story img Loader