उर्फी जावेद प्रकरणात पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात ट्विटरवरून झालेली हमरीतुमरी आपण पाहिलीच आहे. अशात चित्रा वाघ या उर्फी जावेदच्या विरोधात पुन्हा एकदा बोलताना दिसत आहेत तसंच महिला आयोगालाही त्यांनी सवाल केला आहे. उर्फी जावेदच्या उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? असा प्रश्न आता चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला उद्देशून काय म्हटलं आहे?
महिला आयोगाची फक्त भाषा नको आहे तर कृती हवी आहे. भर रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? उर्फी जावेद अत्यंत बीभत्सपणे रस्त्यावर फिरते आहे. महिला आयोगाने याचा जाब का विचारला नाही? माझा विरोध उर्फी या व्यक्तीला नाही. तर तिच्या उघड्यानागड्या, घाणेरड्या, ओंगळवाण्या आणि किळसवाण्या विकृतीला आहे. ज्या पद्धतीने महिला आयोगाने भूमिका मांडली त्याचा अर्थ असं उघडंनागडं फिरण्याला महिला आयोगाचं समर्थन आहे का? कायदा कायद्याचं काम करणारच आहे. आमचं शिंदे फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात आहे. सरकार सरकारचं काम करणार आहेच. मात्र महिला आयोगाला याबाबत काही वाटतं आहे की नाही? अशा पद्धतीचा नंगानाच हा महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. उघडंनागडं सार्वजनिक ठिकाणी फिरणं ही आमची संस्कृती नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- विश्लेषण: उर्फी जावेदवर तिच्या कपड्यांमुळे कारवाई होणार? याबाबत कायद्यात शिक्षेची काय आहे तरतूद?
काय आहे प्रकरण?
उर्फी जावेद ही सोशल मीडिया इंन्फ्लुएन्सर आहे. ती अनेकदा तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होत असते. एवढंच नाही तर तिचे कपडे हे अंगप्रदर्शन करणारे असतात. तिच्या अशा प्रकारच्या कपड्यांवर आणि अर्धनग्न फिरण्यावर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. त्यासाठी त्यांनी तीन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओला उर्फी जावेदनेही उत्तर दिलं होतं. मात्र आता चित्रा वाघ यांनी या प्रकरणात महिला आयोगाने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. महिला आयोग या प्रकरणात शांत का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
हेही वाचा- “मी आत्महत्या करेन किंवा…”, चित्रा वाघ यांच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेदने केलेली पोस्ट चर्चेत
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात वाढता संघर्ष
चित्रा वाघ यांना उर्फी जावेदने ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिल्यानंतर चित्रा वाघ यांनी मला ही कुठे दिसली तर तिचं थोबाड रंगवेन असं वक्यव्य केलं होतं. त्यानंतर महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचं थोबाड रंगवण्याची भाषा केली आहे. चित्रा वाघ यांनी जो इशारा दिला आहे त्यावरून तिच्या जिवालाही धोका असू शकतो. त्यामुळे उर्फीला तिच्या सुरक्षेविषयी काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींची राज्य महिला आयोग दखल घेईल असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता आज चित्रा वाघ या महिला आयोगाच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. महिला आयोगाला उर्फी जावेदचं उघडं फिरणं दिसत नाही का? महिला आयोगाचं उर्फीच्या अशा वागण्याला समर्थन आहे का ? असा प्रश्न आता चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.