भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुलीचं इशा अंबानीचं आनंद पिरामल याच्याशी बुधवारी धुमधडाक्यात लग्न झालं. विवाहाच्या आधीच्या जयपूरमधील सोहळ्यावर व विवाहावर एकूण मिळून 724 कोटी रुपयांचा खर्च झाल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्या. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा खूपच फुगवलेला आहे. सूत्रांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना सगळा खर्च गृहीत धरला तर या विवाहावर झालेला एकूण खर्च 100 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले.

अंबानी कुटुंबीयांचं मुंबईतील निवासस्थान ‘अँटीलिया’ बंगल्यात अगदी थाटामाटात हे लग्न पार पडलं. या सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून राजकारण आणि क्रीडाविश्वापासून ते उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. संपूर्ण हॉटेल भाड्याने घेणे असेल, खास पाहुण्यांसाठी चार्टर्ड विमानं असतील, शाही खाने असतील वा टॉपचे परफॉर्मन्स असतील, सगळ्याचा विचार केला तरी एकूण खर्च 100 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे अंबानी कुटुंबियाशी जवळिक असलेल्या सूत्रांनी सांगितले.

मुख्य विवाहसोहळा पार पडण्याआधी इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचं उदयपूरमध्ये प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार पडलं. यावेळी संगीत, मेहंदी असे अनेक कार्यक्रम पार पडले. ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रेटी, उद्योजकांसह अनेक मान्यवर हजर राहिले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटनदेखील सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, अंबानी यांनी उदयपूरला येणाऱ्या पाहुण्यांसाठी चार्टर्ड विमानं भाड्याने घेतली होती. याआधी अंबानी कुटुंबाने 5100 गरीबांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. चार दिवस ही अन्न सेवा सुरु होती.

दरम्यान अजय पिरामल यांनी सुन इशा अंबानी 452 कोटींचा बंगला भेट म्हणून दिला आहे. लग्नानंतर इशा अंबानी आणि आनंद पिरामल या 452 कोटींच्या आलिशान बंगल्यात राहणार आहे. मुंबईतील वरळीमधील 50 हजार स्क्वेअर फीट जागेवर असणाऱ्या या बंगल्याचं नाव ओल्ड गुलीटा आहे. बंगल्यातून सुंदर समुद्र किनाऱ्याचं दर्शन होणार आहे. तसंच इतरही काही विशेष सुविधा उपलब्ध आहेत.

अजय पिरामल यांनी हा बंगला 2012 रोजी हिंदुस्तान युनीलिव्हरकडून 452 कोटींना खरेदी केली होता. त्यांनी हा बंगला आपला मुलगा आणि होणाऱ्या सुनेसाठी भेट म्हणून दिला आहे. या बंगल्यात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असून एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लग्नानंतर इशा आणि आनंद पिरामल ओल्ड गुलीटामध्ये शिफ्ट होतील.

आनंद आणि इशा जुने मित्र आहेत. आनंदने महाबळेश्वरच्या मंदिरात इशासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. दोन्ही कुटुंबियांचे सुमारे ४० वर्षांपासून चांगले संबंध आहेत. आनंदने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असून सध्या तो पिरामल इंटरप्रायजेसचा कार्यकारी संचालक आहे. त्याने पेन्सिलवेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. हार्वर्डमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने दोन स्टार्टअप सुरू केले. पिरामल रिअल्टीपूर्वी आनंदने ग्रामीण आरोग्य क्षेत्रात पाऊल ठेवत ‘पिरामल स्वास्थ्य’ची स्थापना केली होती.