२००३ मध्ये ‘इश्क विश्क’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. नव्या पिढीच्या प्रेमाची परिभाषा उलगडून सांगणारा हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला होता. आता दशकभरानंतर पुन्हा हीच प्रेमाची भाषा नव्या रंगात, नव्या ढंगात ‘इश्क विश्क रिबाउंड’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन निपुण अविनाश धर्माधिकारीने केले आहे ही आपल्या दृष्टीने आणखी एक खास गोष्ट. या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता रोहित सराफने याआधी ‘मिसमॅच’ या वेबमालिकेच्या निमित्ताने निपुणबरोबर काम केले आहे. निपुणच्या प्रयोगशील दिग्दर्शनशैलीचे कौतुक करतानाच सतत प्रयोग करत राहण्यातूनच उत्तम कलाकृती साधते, असे मत रोहितने व्यक्त केले.
‘इश्क विश्क रिबाउंड’ या चित्रपटात अभिनेता रोहित सराफबरोबरच जिब्रान खान , पश्मिना रोशन आणि नाइला ग्रेवाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल ‘लोकसत्ता’शी बोलताना रोहितने राघव ही व्यक्तिरेखा आपल्यापेक्षा पूर्णत: वेगळ्या स्वभावाची असल्याचं सांगितलं. आपल्या मित्रांना कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणू न शकण्याच्या स्वभावामुळे राघवच्या आयुष्यात अनेक समस्या येतात. अनेकदा तो आपल्या मर्यादा विसरून वाहवत जातो. मी राघवपेक्षा भिन्न स्वभावाचा असल्यानेच असेल पण ही भूमिका करताना आयुष्यात कसं असू नये वा काय करू नये हे या चित्रपटातून शिकायला मिळाल्याचं रोहितने सांगितलं.
हेही वाचा >>> इतिहासात लुप्त झालेली धैर्यकथा
या चित्रपटाच्या निमित्ताने शाहिद कपूर आणि त्याची तुलना केली जात असल्याबद्दल त्याला प्रश्न विचारताच शाहिदबरोबर तुलना होणं ही खूप मोठी गोष्ट असल्याचे त्याने सांगितले. शाहिद कपूर एक उत्तम अभिनेता आणि नर्तक आहे. त्यामुळे त्याच्यासारखं प्रेम मलाही प्रेक्षकांकडून मिळतं आहे याचा आनंद होतो आहे, पण हे दोन्ही चित्रपट फार वेगळे आहेत. तरुणांच्या विचारसरणीवर आधारित हे दोन्ही चित्रपट असले तरी त्याचे विषय आणि मांडणी पूर्ण भिन्न असल्याचे त्याने स्पष्ट केले.
निपुणबरोबर काम करतानाच्या अनुभवाविषयी बोलताना प्रत्येक दृश्याची तालीम उत्तम करून घेण्याच्या त्यांच्या पद्धतीचा अधिक फायदा झाल्याचे त्याने सांगितले. त्यांना आम्ही दृश्यात काही बदल किंवा नवीन काही सुचवले तर ते करून पाहण्यासाठी त्यांनी आम्हाला कधीच थांबवले नाही. प्रयोगशील राहण्याकडे त्यांचा अधिक कल आहे, अशा शब्दांत त्याने कौतुक केले.
माझा कल हा मोजके पण उत्तम चित्रपट साकारण्याकडे आहे. त्या दृष्टीने मी माझ्या चित्रपटांची निवड करतो, कारण मी करत असलेले प्रत्येक काम हे आधीच्या कामापेक्षा उत्तम व्हावे हा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे कथेत महत्त्वाचा भाग असलेली व्यक्तिरेखा साकारायला मला आवडते. रोहित सराफ