भूतसिनेमांचे किंवा भीतीपटांचे गेल्या काही वर्षांत ठराविक फॉर्म्यूले ठरले आहेत. पारंपरिक भीतीपट असेल, तर तरुण-तरुणींचा गट निर्जन ठिकाणी मज्जा करण्यासाठी एकत्र आल्यानंतर तेथील अतृप्त अ-मानवी शक्ती त्यांना एकेक करून संपविण्याचा प्रकार घडविला जातो. एकूणएक व्यक्तींचा खात्मा होईस्तोवर हा भूतधिंगाणा ओंगळवाण्या चेहऱ्याचे आणि कारवायांचे दर्शन घडवितो. आधुनिक भीतीपट असेल, तर तो सीसीटीव्ही फूटेजमध्ये चित्रित झालेल्या गोष्टींना एकत्र करून भयप्रश्न निर्माण करतो. अंगावर काटा आणण्याची मात्रा दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा न दिसणाऱ्या गोष्टींमध्येच अधिक असल्याने या आधुनिक भयपटांमध्ये भयशक्यता अधिक असते. तरीही गेल्या दोन दशकांमध्ये असे रिअ‍ॅलिटी फूटेज भय सिनेमा सातत्याने पाहणाऱ्यांना यातील गोम कळाली आहे. आणखी एका फॉर्म्यूल्यानुसार जगबुडी किंवा जग नष्टीकरणाच्या अवस्थेत लोक झॉम्बी बनून एकमेकांचे रक्त ओरपतात. झॉम्बीसंसर्गापासून बचावलेली चार-दोन माणसे मग बचावासाठी निरनिराळ्या तऱ्हेचे कार्यक्रम आखतात आणि त्यांच्या जीवनलढय़ाचे टप्पे हे भीती निर्माण करण्यासाठी वापरले जातात. ‘इट कम्स अ‍ॅट नाइन’ यातील शेवटच्या फॉर्म्यूल्याचा वापर करतो की काय, असे वाटत असतानाच चांगला भयधक्का देतो. सुरुवातीपासून राखलेल्या भय, संशय आणि अविश्वाच्या संसर्गाचा इथला मारा परिणामकारक आहे. इतर भूत-थरार सिनेमांसारखा इथे सतत घाबरविण्यासाठी मुद्दाम आणलेला आवाजी प्रकार नाही किंवा हिणकस दृश्यांची बरसात नाही. अंगावर काटा निर्माण करणाऱ्या निवडक दृश्यांतून तो मनातल्या भीतीकेंद्राला जागृत करण्याची क्षमता राखून आहे.

‘इट कम्स अ‍ॅट नाइट’मध्ये कुठलेही स्पष्टीकरण दिले जात नाही आणि प्रेक्षकाला त्याच्या विचारांचा वारू उधळण्याची संधी दिली जाते, हा सगळ्यात चांगला भाग आहे. अचानक एका भीषण रोगाचे शिकार होणाऱ्या व्यक्तींमुळे जगापासून लांब जंगलातील घरात दडून राहिलेले इथले एक कुटुंब सुरुवातीलाच दिसते ते एका ठाम निर्णयाप्रत आलेले. नवरा-बायको-मुलगा आणि आजोबा अशा या कुटुंबातील आजोबांना आजाराने घेरल्याचे त्यांच्या शरीरावरील विचित्र जखमांवरून कळते. घरातील इतर तिन्ही व्यक्ती म्हणजे कुटुंबप्रमुख पॉल (जोएल एडगर्टन), सारा (कारमेन जोगो) आणि पौगंडावस्थेत असलेला ट्रॅव्हिस (कॅलव्हिन हॅरिसन) आजोबांच्या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना ठार करण्याचे ठरवितात. चित्रपटाची सुरुवात या विचित्र अंत्यसंस्काराचा सोपस्कार दाखविते. आजोबांच्या घरातील अनुपस्थितीने मनदुर्बळ ट्रॅव्हिस आणखी एकटा होतो. त्याला भीषण स्वप्नांच्या फेऱ्यांमध्ये अडकावे लागते.

एकमेकांसोबत घरात आणि बाहेर वावरणारे हे त्रिकोणी कुटुंब आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत सजग आणि चौकसपणा दाखवितात. ते सतत मास्कमध्ये वावरतात आणि रात्री कोणत्याही परिस्थितीत बाहेर न पडण्याचा निर्णय घेतात. एका रात्री त्यांच्या घराचा दरवाजा तोडून एक व्यक्ती घुसखोरी करण्याचा प्रयत्न करते. हे कुटुंब त्याला जायबंदी करते. जायबंदी झालेली व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी शुद्ध पाणी शोधण्यास बाहेर पडलेली असल्याचे त्यांना सांगते. पॉल आणि सारा अनेक बाजू पडताळून त्याच्या कुटुंबाला आपल्यासोबत राहण्यास बोलावते. आता एकाच घरामध्ये दोन त्रिकोणी कुटुंब वावरू लागतात. आणखी माणसे आल्यामुळे आपण प्रबळ बनल्याचा भ्रम काही दिवस या कुटुंबातील व्यक्तींना वाटू लागतो. मात्र परिस्थिती बदलत जाते. बाहेर पसरलेल्या संसर्गाहून अधिक व्यक्तींमध्ये एकमेकांविषयीच्या अविश्वासाचा संसर्ग अधिक जोमाने पसरतो. गोष्ट अवघड आणि निश्चित वळणाकडे जाण्यासाठी सज्ज होते.

चित्रपटातून नायक आणि खलनायक असे दोन्ही घटक बाद आहेत. ट्रॅव्हिस या येथील पौगंडावस्थेतील मुलाच्या स्वप्नांची मालिका चित्रपटामध्ये सक्रिय राहिलेली आहे. त्यांमधून काही सेकंदांची अतिपरिणामकारक भयदृश्ये तयार झाली आहेत. ती वगळता हा संपूर्ण चित्रपट ना-भीतीपट आहे. एका निर्जन ठिकाणी उरलेल्या जगातील शेवटच्या माणसांमध्ये तयार होणाऱ्या एकमेकांविषयीच्या काळजीसोबत स्वरक्षणाच्या दडपणाची ही कहाणी पारंपरिक फॉर्म्यूल्याची प्रचंड मोडतोड करून बनली आहे. अप्रतिम असे कॅमेरावर्क, कलाकारांचा चौकस अभिनय आणि दिग्दर्शक ट्रे एडवर्ड शल्ट्झ यांनी भीतीपटांच्या सध्याच्या ट्रेण्ड्सचा अभ्यास करून चोखाळलेली वेगळी वाट यांमुळे हा चित्रपट आज तयार होणाऱ्या भयपटांपेक्षा भिन्न आहे. फॉर्म्यूलेबाज भीतीपटांना पाहून भयरसाचे झरे बोथट झाले असल्यास त्यावर अलीकडच्या चार-दोन गाजणाऱ्या भीती-थरारक नावांपेक्षा हा चित्रपट बरा उतारा आहे.