अभिनेता रितेश देशमुखने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणारा रितेश हा अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. रितेश देशमुखने लय भारी या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर आता लवकरच तो वेड या मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये फार उत्सुकता पाहायला मिळत आहे.
रितेश देशमुख हा नेहमी स्पष्टवक्ता म्हणून ओळखला जातो. तो नेहमी मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे प्रयोग करत असतो. २०१३ मध्ये त्याने बालक पालक आणि त्यानंतर यलो या चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले होते. नुकतंच त्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शन क्षेत्रातील पदार्पण, मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टी याबद्दल भाष्य केले. यावेळी तो म्हणाला, “मला दिग्दर्शन क्षेत्राचे अनेक वर्षांपासून आकर्षण होते. पण मी अभिनय करत असल्यामुळे ते करण्याचे धाडस मला होत नव्हते. पण गेल्या तीन-चार वर्षांत मी ते करु शकतो का? मला ते जमेल का याबद्दल मी विचार केला. त्यानंतर मी वेड हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचे ठरवले.”
आणखी वाचा : “आमचे नाते पक्के होणार होतं पण तेव्हाच…”, रितेश देशमुखने उघड केले गुपित
“महाराष्ट्र राज्य सिनेसृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पण अनेक हिंदी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत मराठी चित्रपटांना फार मोठा संघर्ष करावा लागतो. मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक पहिली पसंती देताना दिसतात. त्यामुळे एकाच राज्यात हिंदी चित्रपटांबरोबर स्पर्धेत टिकून राहणे हे मराठी चित्रपटासांठी फार कठीण आहे. अनेक चांगल्या मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळत असल्याने त्यांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही याचा परिणाम होतो.
पण नागराज मंजुळेंचा सैराट, महेश मांजरेकरांना नटसम्राट यासारखे अनेक मराठी चित्रपट सुपरिहट झाले आहेत. प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यासाठी राज्याला दरवर्षी किमान दोन चांगले मराठी चित्रपट निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. यामागे आपण तिसऱ्या वरुन दुसऱ्या आणि दुसऱ्या वरुन समान पातळीवर कसे जाऊ शकतो याबद्दल विचार करणे गरजेचे आहे. आपण प्रेक्षकांना कशाप्रकारे आकर्षित करु शकू याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. त्यातील ९ ते १० कोटी प्रेक्षक हे मराठी भाषिक आहेत, असा मला ठाम विश्वास आहे”, असे रितेश देशमुख म्हणाला.
आणखी वाचा : ऋषभ पंतपाठोपाठ ऑस्ट्रेलियाला गेलेल्या उर्वशी रौतेलाने दिले स्पष्टीकरण, म्हणाली…
दरम्यान वेड या मराठी चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख हा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर आता रितेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही तब्बल १० वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. यासाठी तिने वेड या मराठी चित्रपटाची निवड केली आहे. या पूर्वी जिनिलियाने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.