आपल्या कारकिर्दीतला ‘रांझना’ चित्रपटासाठीचा पहिला सहाय्यक अभिनेत्रीचा ‘स्क्रीन’ पुरस्कार स्वीकारताना स्वरा भास्करने सूत्रसंचलन करत असलेल्या शाहरूख खानला ओरडून सांगितलं होतं.. की लहानपणापासून ती त्याची चाहती आहे आणि लवकरच तिला त्याची नायिका म्हणून काम करायचं आहे. हे सांगतानाही तिचा उत्साह ओसंडून वाहत होता. शाहरूखच्या सुपरस्टार असण्याचं दडपण किंवा भिती यांचा लवलेश तिच्या चेहऱ्यावर नव्हता. अर्थात, तिच्या या विनंतीला शाहरूखनेही हसत हसत मान्यता दिली. लहानपणापासून बॉलिवूडच्या स्वप्नाळू विश्वात रमलेली आणि त्यासाठी दिल्लीहून मुंबई गाठणाऱ्या स्वराला हिंदीत पाय रोवणं अशक्य वाटत नाही. फक्त तुमचा तुमच्या कामावर विश्वास असला पाहिजे, असं ती सांगते. ‘रांझना’, ‘औरंगजेब’ ते आता थेट सूरज बडजात्यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात सलमानबरोबर काम करण्याची संधी मिळालेली स्वरा अजूनही शाहरूखबरोबर काम करणं हे आपलं स्वप्न असल्याचं सांगते.
सूरज बडजात्यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटात तुला सलमान खान आणि पुन्हा एकदा सोनम कपूरबरोबर काम करायला मिळणार आहे.
मी हा चित्रपट करते आहे हे खरं आहे पण, माझी नेमकी भूमिका काय आहे हे मला सांगता येणार नाही. त्याच्याबद्दलची अधिकृत घोषणा सूरज बडजात्यांकडूनच होणं अपेक्षित आहे. सलमान खान आणि राजश्री प्रॉडक्शन्स दोन्ही गोष्टींशी इतरांप्रमाणे मीही लहानपणापासून जोडले गेले आहे. त्यामुळे आता स्वत: त्यांच्या चित्रपटाचा भाग होतानाच आनंद नक्कीच वेगळा आहे. सोनमशी तर ‘रांझना’पासून फारच चांगली मैत्री झाली आहे. सोनम एक चांगली कलाकार आहेच पण एक व्यक्ति म्हणून ती फारच वेगळी आणि मनमोकळी अशी आहे. तिच्या स्टारडमचा बडेजाव ती कधीच करत नाही..
पण, तरीही बॉलिवूडमध्ये प्रस्थापित कलाकारांकडून नव्यांना फारशी चांगली वागणूक मिळत नाही असं म्हटलं जातं..
मला स्वत:ला तरी तसा अनुभव आलेला नाही. तुमचं काम कसं आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आता सोनमचंच उदाहरण घ्यायचं झालं तर ‘रांझना’च्या वेळी ती अनिल कपूरसारख्या नावाजलेल्या कलाकाराची मुलगी आहे ही एक गोष्ट पण, तिने स्वत:ही अभिनेत्री म्हणून नाव कमावलं आहे. असं असतानाही पहिल्या दिवसापासून आमची चांगली गट्टी जमली. तुम्हाला खरं वाटणार नाही पण, ‘रांझना’ मध्ये माझी जी व्यक्तिरेखा होती ती सोनमला फार आवडली होती. आणि मी ती व्यक्तिरेखा एकदम सहज, चोख केली आहे असं तिचं म्हणणं होतं. एकदा माझे शॉट बघितल्यानंतर तू पुढे जाऊन माझ्यापेक्षाही चांगली अभिनेत्री होशील पैज लावून सांगते, इतक्या मनमोक ळेपणाने तिने माझं कौतूक केलं.
श्याम बेनेगलांच्या ‘संविधान’ या मालिकेत सूत्रसंचलन करावंसं का वाटलं?
मला पहिल्यांदा जेव्हा असं सांगितलं की आपल्या देशाची घटना कशी तयार झाली? काय घडामोडी घडल्या? कशाप्रकारे त्याची वादविवाद, चर्चा-अभ्यास करून मांडणी केली गेली. हे सगळं ऐकल्यानंतर असं एरव्ही केवळ ग्रंथालयात असणाऱ्या या घटनेवरची मालिका म्हणजे कंटाळवाणी असेल, अशीच माझी कल्पना होती. पण, तरीही श्याम बेनेगलांसारखे दिग्दर्शक आहेत म्हटल्यावर मी थोडा गांभिर्याने विचार करायचं ठरवलं. मालिकेचा पहिला लिखित भाग जेव्हा मला ऐकवला गेला तेव्हा त्यात इतकं नाटय़ होतं, त्यावेळच्या चर्चा, नेत्यांनी दाखवलेला मुत्सद्दीपणा या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर अशाप्रकारे लोकशाही देश घडवणारी राज्यघटना जिथे लिहिली गेली त्या देशाची मी नागरिक आहे याच्या सार्थ अभिमानाने मन भरून गेलं होतं. ‘संविधान’ ही खरोखरच खूप चांगली आणि अभ्यासात्मक अशी मालिका आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाने ती पाहिलीच पाहिजे.
श्याम बेनेगल यांच्यासारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकाबरोबर काम करताना तुला काय जाणवलं?
श्याम बेनेगल आणि हिंदी सिनेमा एकच नाव आहे, असं मला वाटतं. ते इतके मोठे आहेत तरीही समोरच्या कलाकाराला ते सहज समजून घेतात. त्यांची दिग्दर्शनाच्या पध्दतीत एक शिस्त आहे, एक विचार आहे. त्यांचा भर हा सरावावर असतो, तुम्ही तुमच्या भूमिकेचा गृहपाठ केलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर आणि इतरांबरोबर काम केल्यानंतर मला फार मोठा फरक जाणवला तो हा की, नविन दिग्दर्शक असेल तर एखादा सीन कसा झाला पाहिजे, याबद्दल त्यांचा असा एक आग्रह असतो. पण, जसजसा दिग्दर्शक चित्रपटागणिक मोठा होत जातो त्याच्या दृष्टिकोनात फार बदल होतो. जे नावाजलेले दिग्दर्शक आहेत ते आपल्या कलाकारांना स्वातंत्र्य देतात. ते त्यांच्याकडून काम काढून घेतात आणि तेव्हाच खरं कलाकार म्हणून आपण घडायला लागतो, असं मला वाटतं.