हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात वाईट सिनेमा शोधून त्याला दरवर्षी ‘गोल्डन केला पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी या पुरस्कारासाठी शाहरूखचा ‘जब तक है जान’ आणि सलमानचा ‘दबंग २’ या दोन चित्रपटांमध्ये चढाओढ सुरू आहे. या दोन चित्रपटांसह ‘हाऊसफुल २’, ‘सन ऑफ सरदार’, ‘खिलाडी ७८६’आणि ‘जोकर’ यांचाही वाईट चित्रपटांच्या यादीत समावेश आहे.
मूळ ‘गोल्डन रास्पेरी अ‍ॅवॉर्ड्स’ची भारतीय आवृत्ती असलेले ‘गोल्डन केला अ‍ॅवॉर्ड्स’ हे लोकांनी निवडून दिलेल्या चित्रपटांना दिले जातात. यावर्षी या पुरस्कारांसाठी विविध विभागातील नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. सर्वात वाईट अभिनेता म्हणून ‘रावडी राठोड’, ‘खिलाडी ७८६’, ‘जोकर’ असे चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारचे नाव आघाडीवर असून त्यापाठोपाठ ‘सन ऑफ सरदार’साठी अजयचे नाव निश्चित झाले आहे. यांच्याबरोबर ‘एक मै और एक तू’ चित्रपटासाठी इम्रान खान, ‘अग्निपथ’मधील वाईट खलनायकी भूमिकेसाठी संजय दत्त आणि ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातील वरूण धवन, सिध्दांत मल्होत्रा यांना वाईट अभिनेता म्हणून नामांकन मिळाले आहे.
अभिनेत्रींमध्ये वाईट भूमिकेसाठी ‘जब तक है जान’मधील अनुष्का शर्माने आघाडी घेतली आहे. तिच्यापाठोपाठ एका साच्यातील भूमिका करणाऱ्या सोनाक्षी सिन्हाची वर्णी लागली आहे. तर ‘कॉकटेल’मधील वेरोनिकाची भूमिका करणाऱ्या दीपिकालाही वाईट काम करणारी अभिनेत्री म्हणून नामांकन मिळाले आहे. या तिघींना स्पर्धा आहे ती फराह खान, अलिया भट्ट आणि डायना पेंटीची. तर वाईट दिग्दर्शकांच्या यादीत पहिले नाव आहे ते पदार्पणातच ‘जोकर’सारखा सुपरफ्लॉप चित्रपट देणाऱ्या शिरीष कुंदेरचा. दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू करणाऱ्या अरबाझ खानचा या यादीत दुसरा क्रमांक आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर’साठी करण जोहर, ‘एक था टायगर’साठी कबीर खान आणि ‘हाऊसफुल २’ साठी साजिद खान यांची नावं या वाईट काम करणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

Story img Loader