‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधून यश चोप्रांनी अनिवासी भारतीयांचे अस्तित्व ठसठशीतपणे पहिल्यांदा हिंदी सिनेमामध्ये मांडले. तेव्हापासून परदेशांत हिंदी चित्रपटांना लाभत असलेल्या मोठय़ा प्रेक्षकवर्गाची पावतीच जणू यश चोप्रा यांच्या ‘जब तक है जान’ या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादातून मिळाली आहे. भारतीय टॉप टेनमध्ये पहिल्या पाचात असलेल्या या चित्रपटाने हॉलिवूडमधील टॉप टेनमध्ये ८वा क्रमांक पटकावला आहे. १५ दिवसांत या सिनेमाने हॉलिवूडमध्ये सव्वा कोटी डॉलरहून अधिक (सुमारे ७१ कोटी रुपये) कमाई केली आहे.
बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही सर्वाधिक धंदा करणाऱ्या चित्रपटांची यादी तयार केली जाते. गेल्या दोन आठवडय़ांत सर्वाधिक धंदा करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘जब तक है जान’चा समावेश झाला आहे. हॉलिवूडमधील निष्ठावान भारतीय प्रेक्षकांमुळे बॉलिवूडच्या चित्रपटांना अमेरिकेतील जवळपास सर्वच मुख्य शहरांमध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणाऱ्या पहिल्या २० चित्रपटांमध्ये आपल्या चित्रपटांचा समावेश सहसा होतोच. मात्र, ‘जब तक है जान’ने हॉलिवूडच्या तिकीटबारीवर १.३ कोटी अमेरिकी डॉलरची कमाई करीत थेट आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. ‘बॉलिवूडचे चित्रपट इथे रीतसर प्रदर्शित होत असले तरी येथील ‘टॉप टेन’मध्ये स्थान मिळवणे त्यांच्यासाठी फार अवघड असते.
या पाश्र्वभूमीवर ‘जब तक है जान’ला मिळालेले यश नक्कीच वाखाणण्यासारखे आहे,’ असे मत हॉलिवूडचे वितरक जेफ बॉक यांनी व्यक्त केले आहे. सध्या तिथे ‘ट्विलाइट सागा’चा पाचवा आणि अखेरचा सिक्वल प्रदर्शित झाला आहे. ‘ट्विलाइट सागा : ब्रेकिंग डॉन पार्ट २’ हा स्टिफनी मेयर यांच्या कादंबरीवर निघालेल्या ‘ट्विलाइट’ मालिकेतील शेवटचा चित्रपट आहे. ‘व्हॅम्पायर’ आणि ‘वेअरवूल्फ’ या दोन वेगवेगळ्या रक्तपिपासू जमातींमध्ये वर्षांनुवर्षे सुरू असणाऱ्या युद्धाची, त्यांच्यात फुलू पाहणाऱ्या प्रेमाची आगळी कथा सांगणारे ‘ट्विलाइट’ मालिकेतील याआधीचे सगळे चित्रपट यशस्वी झाले आहेत. त्यामुळे या अखेरच्या चित्रपटालाही यश मिळणार हे भाकीत होते.
एकटय़ा अमेरिकेत या चित्रपटाने १४१.१ कोटी डॉलरची कमाई करीत सर्वोच्च स्थान पटकावले. दुसऱ्या क्रमांकावर ‘स्कायफॉल’ हा बॉण्डपट, तिसऱ्या क्रमांकावर स्टीव्हन स्पिलबर्गचा ‘लिंकन’, चौथ्या क्रमांकावर डिज्नीचा ‘रेक इट राल्फ’ हा अॅनिमेशनपट, पाचव्या क्रमांकावर डेंझेल वॉशिंग्टनची मुख्य भूमिका असलेला ‘फ्लाइट’, सहाव्या क्रमांकावर इराणमध्ये ओलीस ठेवलेल्या सहा अमेरिकी तरुणांची वास्तव कथा सांगणारा ‘आर्गो’, सातव्या क्रमांकावर ‘टेकन २’ आणि आठव्या क्रमांकावर ‘जब तक है जान’ला स्थान मिळाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा