अ‍ॅक्शन स्टार जॅकी चॅन आज वयाच्या ६४ व्या वर्षी देखील अ‍ॅक्शनदृश्ये स्वत:च करतो. आज अद्ययावत तंत्रज्ञान, स्पेशल इफेक्ट, कॅमेरा ट्रिक्स अशी सशक्त माध्यमे उपलब्ध असूनदेखील जॅकी चॅनचा त्यावर विश्वास नाही. त्याच्या मते जी मजा इमारतीवरून स्वत: उडी मारण्यात आहे ती स्पेशल इफेक्ट्समध्ये नाही. स्पेशल इफेक्ट्सद्वारे चित्रीकरण करायचे आणि अ‍ॅक्शन स्टार म्हणून फुशारक्या मारायच्या हे त्याच्या तत्त्वात बसत नाही. म्हणून चित्रपटातील नव्वद टक्के स्टंट्स तो स्वत:च करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९६० च्या दशकात ‘तोशिरो मिफ्यून’, ‘ब्रूस ली’, ‘सामो हंग’ या अ‍ॅक्शन अभिनेत्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्याने चिनी सिनेसृष्टीत प्रवेश केला. विनोदी अभिनय शैली आणि अ‍ॅक्शन हिरो म्हणून सुरू झालेला त्याचा प्रवास ‘किंग ऑफ कॉमेडी’, ‘सिटी हंटर’, ‘क्राइम स्टोरी’, ‘ड्रंकन मास्टर’, ‘पोलीस स्टोरी’ सारख्या तब्बल १३० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केल्यानंतरही त्याच वेगात सुरू आहे. आज फक्त चीनमध्येच नाही तर संपूर्ण जगात जॅकी लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. परंतु वयाबरोबर त्याच्या शरीरातील वेग मंदावत गेला आणि एकेकाळी गाडय़ांवरून उडय़ा मारणे, इमारतींवर लटकणे, कुंग फू-कराटे फाइट यामुळे लोकप्रियता मिळवणाऱ्या जॅकीने अलीकडे ‘द कराटे किड’ ‘द फॉरेनर’, ‘नामिया’ अशा गंभीर प्रकारच्या चित्रपटांमधून काम करण्यास सुरवात केली.

आपल्या हालचालींनी अवाक करणारा जॅकी आता शांत व्यक्तिरेखा साकारतोय हे त्याच्या चाहत्यांना फारसे रुचत नाही. कारण त्यांना आजही जॅकीला त्याच्या जुन्याच अवतारात पाहायचे आहे. त्याच्या मते कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याने मिळतील ते चित्रपट केले. पण जसजसा तो मोठा कलाकार म्हणून नावारूपाला आला तसतसा त्याने आपल्या अभिनय शैलीत काही प्रयोग करून पाहणे गरजेचे होते. त्यावेळी संधी असूनही त्याने फार काही वेगळे केले नाही. याचा परिणाम त्याच्या कारकिर्दीवर झाला नसला तरी देखील एक परिपूर्ण कलाकार म्हणून नावारूपाला येण्याची संधी त्याने गमावली याची खंत त्याच्या मनात आहे. पण चाहत्यांसाठी शेवटच्या चित्रपटापर्यंत अ‍ॅक्शन दृश्ये करण्याची मात्र त्याची तयारी आहे.