बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकीकडे दिशाच्या या चित्रपटाची सोशल मीडयावर चर्चा असताना तिचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. दिशा पाटनी मागच्या काही वर्षांपासून अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत होती. अर्थात या दोघांनी त्यांच्या नात्यावर उघडपणे बोलणं नेहमीच टाळलं होतं. पण बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये तसेच कार्यक्रमात दोघंही नेहमीच एकत्र दिसले होते. आता या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. यावर आता टायगर श्रॉफचे वडील जॅकी श्रॉफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘बॉम्बे टाइम्स’शी बोलताना मुलाच्या ब्रेकअपच्या चर्चांवर बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले, “ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र होते. आताही ते चांगले मित्र आहेत. मी त्यांना नेहमीच एकत्र एन्जॉय करताना आणि टाइम स्पेंड करताना पाहतो. मी माझ्या मुलाच्या लव्ह लाइफमध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब करणं मला आवडत नाही. ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहे. कामाव्यतिरिक्तही ते एकमेकांसाठी वेळ काढतात. फिरायला जातात.”
जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले, “हे त्यांचं खासगी आयुष्य आहे आणि त्यातील निर्णय ते दोघंही स्वतः घेऊ शकतात. त्यांना एकत्र राहायचं आहे की नाही हे त्यांना ठरवायचं आहे. ते एकमेकांसाठी योग्य आहेत किंवा नाही हे देखील त्यांनाच ठरवायचं आहे. ही त्यांची लव्हस्टोरी आहे. मी आणि माझ्या पत्नीची वेगळी लव्हस्टोरी आहे. आमचं दिशासोबत चांगलं बॉन्डिंग आहे. आम्ही एकमेकांना भेटून आनंदी असतो.”
आणखी वाचा- टायगर श्रॉफ- दिशा पाटनीचं ब्रेकअप? दोघांमध्ये वर्षभरापासून वाद असल्याच्या चर्चा
दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांनी २०२२ च्या सुरुवातीलाच वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता असं बोललं जात आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृतानुसार, टायगर आणि दिशा यांचा ब्रेकअप झालं असून मागच्या वर्षभरापासून दोघांमध्ये वाद सुरू होते. दरम्यान दिशा पाटनी किंवा टायगर श्रॉफनं या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या वृत्ताची पुष्टी झालेली नाही.
दिशाच्या कामाबद्दल बोलायचं तर तिची मुख्य भूमिका असलेला ‘एक व्हिलन रिटर्न्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात अर्जुन कपूर, तारा सुतारिया, जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर टायगरनं काही दिवसांपूर्वीच ‘स्क्रू ढीला’ चित्रपटाची घोषणा केली आहे.