बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आता मोठ्या अडचणीत सापडली आहे. आयकर विभागानं जॅकलिनच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत तिची संपत्ती जप्त केली आहे. ज्यात तिच्या ७.१२ कोटी रुपयांच्या फिक्स डिपॉझिटचाही समावेश आहे. मनी लँड्रिंगच्या प्रकरणात फसलेल्या जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात आयकर विभागानं केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणातील ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी जोडलं गेल्यानंतर जॅकलिन आयकर विभागाच्या रडारवर होती. दरम्यानच्या काळात जॅकलिनची कसून चौकशी देखील झाली होती. मात्र स्वतःवर लावण्यात आलेल्या आरोपांचं जॅकलिननं खंडन केलं होतं. सुकेश चंद्रशेखरसोबतचं रिलेशनशिप देखील तिने अमान्य केलं होतं. आता आयकर विभागानं जॅकलिनवर कारवाई करत तब्बल ७.२७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
आणखी वाचा- “छत्रपती शिवरायांवरील चित्रपटाला स्क्रिनसाठी झगडावं लागतंय”, चिन्मय मांडलेकरनं व्यक्त केली खंत
आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसला ठग सुकेश चंद्रशेखरनं ५.७१ कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. एवढंच नाही तर त्यानं तिच्या कुटुंबीयांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. हा सर्व पैसा सुकेशनं लोकांची फसवणूक करून आणि गुन्हेगारीतून कमावला होता. दिल्लीमध्ये तुरुंगात असताना त्यानं एका महिलेचे २०० कोटी रुपये फसवणूक करुन लांबवले होते. आयकर विभागनं दिलेल्या माहितीप्रमाणे जॅकलिनच्या विरोधातील ही प्राथमिक कारवाई आहे. या प्रकरणात तिच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा- श्वेता तिवारीच्या वैवाहिक जीवनाबद्दल मुलगी पलकचा मोठा खुलासा, म्हणाली…
दरम्यान उपलब्ध माहितीनुसार, ‘तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करत असे. तो स्पूफिंगद्वारे तिहार जेलमधून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटलं गेलंय. त्याने जॅकलिनला काही महागाड्या भेटवस्तू देखील गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या. पण चौकशीदरम्यान भेटवस्तू पाठवणारी आणि फोन करणारी व्यक्ती जेलमध्ये असल्याची तिला कल्पना देखील नव्हती’, असे जॅकलिन म्हणाली होती.