सलमान आणि साजिद नाडियादवाला कृपेने ‘किक’ सारखा मोठा चित्रपट मिळवणाऱ्या अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिसची बॉलिवूड कारकिर्द आता चांगलीच रुळावर आली आहे, असे म्हणायला हरकत नाही. सलमानची वास्तव आयुष्यातील खरी नायिका म्हणून सध्या तिचा बोलबाला होतो आहे. आता ‘किक’च्या यशामुळे तिच्याकडेही चांगल्या चित्रपटांची गर्दी झाली असून पुढच्या वर्षभरात तिचे चार चित्रपट एकापाठोपाठ एक झळकण्याची शक्यता आहे.
जॅकलिन दिग्दर्शक साजिद खानचा हात धरून बॉलिवूडमध्ये आली खरी..पण, तीन-चार नायिकांच्या गर्दीतली एक हीच तिची ओळख होती. मात्र, ‘बीईंग ह्युमन’ सलमानभाईचा हात जो कोणी धरेल तो बॉलिवूडमध्ये तरी सतत वर-वरच चढत राहतो हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे ‘किक’सारख्या महत्वाकांक्षी चित्रपटात जेव्हा सलमानने जॅकलिनचा नायिका म्हणून हात धरला तेव्हाच तिची नैय्या तीराला लागणार याची खूणगाठ बांधली गेली होती. आणि आता ‘किक’ला मिळालेल्या यशानंतर तर तिच्या आयुष्याचा सगळा नूरचा पालटला आहे.
‘किक’मध्ये जॅकलिनला घेऊन चित्रपट हिट झाला म्हणून सलमान खूष! सलमान खूष तर पुढेमागे जॅकलिनला घ्यायला हरकत नाही, असा विचार करून निर्माते खूष.. त्यामुळे पुढच्या वर्षीसाठी जॅकलिन चौपट खूष असा सगळा खुषीचा माहौल आहे. ‘किक’नंतर जॅकलिनचा महत्वाकांक्षी आणि तिची आत्तापर्यंतची प्रतिमा बदलून टाकणारा ‘रॉय’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘रॉय’मध्ये जॅकलिन अर्जुन रामपाल आणि रणबीर कपूरबरोबर काम करताना दिसणार आहे. त्यानंतर ‘बंगिस्तान’ या चित्रपटाचेही चित्रिकरण तिने पूर्ण केले आहे. ‘बंगिस्तान’ हा रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटची निर्मिती असून यात रितेश देशमुख आणि पुलकित सम्राट तिच्याबरोबर आहेत. तर करण मल्होत्राच्या ‘ब्रदर्स’ चित्रपटाचे चित्रिकरण या महिन्यात सुरू होणार असून ‘हाऊसफुल्ल ३’चीही घोषणा करण्यात आली आहे. ज्यात जॅकलिनबरोबर अभिषेक बच्चन, अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हे चारही चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याने जॅकलिनने भाईच्या मदतीने चांगलाच चौका मारल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू आहे. छ
जॅकलिनचे पुढच्या वर्षी चार चित्रपट
सलमान आणि साजिद नाडियादवाला कृपेने ‘किक’ सारखा मोठा चित्रपट मिळवणाऱ्या अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिसची बॉलिवूड कारकिर्द आता चांगलीच रुळावर आली आहे

First published on: 12-10-2014 at 06:17 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandez four films next year