बॉलिवूडच्या दबंग खान सलमानच्या २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेस ३’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री म्हणजे जॅकलीन फर्नांडीस. जॅकलीनला तिच्या आगामी चित्रपटात एक वेगळी भूमिका करण्याची इच्छा आहे. त्यामुळे ती अभिनेता सुशांत सिंग राजपूतसह अमेरीकेत अभिनयाचे धडे घेण्यात व्यग्र आहे.
‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार जॅकलीन १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘अर्थ’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणार आहे. दरम्यान चित्रपटात स्मिता पाटीलची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. तसेच चित्रपटात अभिनेत्री शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा, स्मिता पाटील, राज किरण आणि रोहिनी हट्टंगडी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. ‘अर्थ’ हा चित्रपट विवाहबाह्य संबंधावर आधारित आहे. तसेच या चित्रपटानंतर भारतीय चित्रपटाचा कायापालट झाल्याचे समजले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ‘अर्थ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य कलाकार रेवथी करणार असून जॅकलीनला चित्रपटातील स्मिता पाटील यांच्या भूमिकेबाबत विचारण्यात आले आहे. जॅकलीनला चित्रपटाची कथा आवडली असल्याचे देखील म्हटले जात आहे. तसेच या चित्रपटात काम करण्यासाठी जॅकलीन फार उत्साही आहे.
जॅकलिन लवकरच एका नेटफ्लिक्स ओरिजनल चित्रपटात काम करणार आहे. तसेच या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यग्र आहे. तिने या नेटफिक्स चित्रपटाची सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. आता चाहते या चित्रपटासाठी फार उत्सुक आहेत.