‘किक’ चित्रपटाच्या दरम्यान जॅकलिन फर्नाडिस आणि सलमान खानचे सूत जुळल्याच्या चर्चेला उधाण आले होते. पण या अफवांना नाकारत सलमान खान आपल्यासाठी आदर्श असल्याचे जॅकलिनने सातत्याने प्रसारमाध्यमांना सांगितले होते. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जॅकलिनने सलमानकडून हिंदीचे धडे घेण्यास सुरुवात केली होती आता आगामी ‘रॉय’ चित्रपटासाठी स्वत: एक चित्र रेखाटून याही बाबतीत आपण सलमानकडून प्रेरणा घेतल्याचे जॅकलिनने दाखवून दिले आहे.
सलमान खानने कित्येक परदेशी अभिनेत्रींच्या बॉलीवूड कारकीर्दीला हातभार लावण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. कतरिनापासून ते जॅकलिनपर्यंत कित्येकांची कारकीर्द खुलविण्यात सलमानने त्यांना मदत केली आहे. त्याचबरोबर सलमानने या अभिनेत्रींसाठी घेतलेल्या हिंदी भाषेच्या शिकवणीची चर्चाही बॉलीवूडमध्ये सतत होत असते.
‘किक’ चित्रपटाच्यावेळेस आपले हिंदी सुधारण्यासाठी सलमानने मदत केल्याचे ती स्वत: सांगते. पण जॅकलिनने केवळ सलमानकडून हिंदीचीच शिकवणी घेतली नसून चित्रकलेच्या बाबतीतही तो आपला आदर्श असल्याचे तिने सांगितले.
सलमानने त्याचे चित्रकलेतील कौशल्य अनेकदा दाखवून दिले आहे. ‘जय हो’ चित्रपटाचे पोस्टरही त्याने स्वत: रेखाटले होते. आता जॅकलिननेही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत चित्रकलेचे कसब आजमावण्याचे ठरविले आहे. या गोष्टीला निमित्त झाले तिच्या आगामी ‘रॉय’ चित्रपटाचे. चित्रपटामध्ये एका प्रसंगात जॅकलिनला ती चित्र काढत असलेला प्रसंग चित्रित करायचा होता. त्यावेळी केवळ चित्र काढण्याची नक्कल करण्याऐवजी जॅकलिनने स्वत: चित्र काढण्याची इच्छा बोलून दाखविली. इतकेच नाही, तर तिने समोरच्या कुंचल्यांमधून कॅन्व्हासवर चित्र रेखाटलेही.

Story img Loader