शारीरिक व मानसिक स्वास्थ मिळावे यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करण्याची गरज आहे, असं आपण वारंवार ऐकत असतो. बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत, जे नियमितपणे योग आणि व्यायाम करतात. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. आज २१ जून म्हणजेच जागतिक योगदिन. यानिमित्त अनेक अभिनेत्रींनी योगाचे महत्त्व सांगणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसने सुद्धा तिच्या जीवनातील योगाचे महत्त्व सांगितले आहे.

जॅकलिन म्हणाली की, “योगाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. योगामुळे शरीराला लवचिकता प्राप्त होते. ताकदही मिळते. योगामुळे मला शारीरिक स्वास्थ्यासंबंधीच्या अनेक गोष्टींची जाणीव झाली. फक्त शारीरिकच नाही तर,योगसाधना मनाशी सुद्धा निगडित आहे.” जॅकलिन पुढे असंही म्हणाली की, “भारतात आल्यानंतर मी सगळ्यात आधी योग करायला सुरुवात केली. मी कार्टर रोडला जाऊन एका ग्रुपमध्ये योगाचा सराव करायचे. ही १० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नियमित योग करत नसले तरीही, मी मानसिक शांततेसाठी योग करते.” योगाचे फायदे सांगताना ती म्हणाली की, “योगाचा प्रवास खूप समाधानकारक आहे. एक व्यायाम म्हणून या गोष्टीकडे बघू नका. योग ही एक साधना आहे व त्यासाठी संयम बाळगणे महत्त्वाचे आहे.”

जॅकलिन लवकरच एका नेटफ्लिक्स ओरिजनल चित्रपटात काम करणार आहे. तसेच या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यग्र आहे.

Story img Loader