अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस इन्स्टाग्रामव्दारे नेहमी चाहत्यांशी संवाद साधात असते. तसेच फोटो देखील शेअर करत असते. यावेळी जॅकलिनने तिच्यासारखी दिसणारी अमान्डा सेर्नीसोबतचा ‘थ्रोबॅक’ फोटो शेअर करुन तिला भारतात येण्याची विनंती केली आहे. जॅकलिनच्या विनंतीचा मान ठेवून अमान्डा मुंबईमध्ये तिच्या भेटीसाठी पोहोचली आहे.
गेल्या वर्षी अभिनेत्री जॅकलिन आणि अमान्डा यांची भेट झाली होती. अमान्डाचे वागणे आणि दिसणे पाहून जॅकलिन थक्क झाली होती. जॅकलिनने अमान्डा आणि तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत, ‘आम्हा दोघींनाही विश्वास आहे की जन्मानंतर आम्हा दोघींची नक्कीच ताटातूट झाली असेन’ असे जॅकलिनने लिहिले होते. त्या दोघींचा हा फोटो सोशल मीडियावर त्यावेळी तुफान व्हायरल झाला होता. तसेच या फोटोची चर्चाही सोशल मीडियावर झाली होती.
काही दिवसांपूर्वीच जॅकलिनने तिचा आणि अमान्डाचा ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘अमान्डा आता मला मुंबईत भेटण्याची वेळ झाली आहे. तू मुंबईत ये’ असा संदेश जॅकलिनने फोटोखाली लिहिला होता.
आपल्या जवळच्या मैत्रीणीच्या आमंत्रणाचा मान ठेवत अन्माडाने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. तसेच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती विमानाने मुंबई प्रवास करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर काही वेळातच तिला मुंबई विमानतळावर पाहण्यात आले. आता चाहत्यांना जॅकलिन आणि अमान्डाच्या नव्या फोटोंची उत्सुकता आहे.