बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदय विकाराचा झटका आला आहे. किम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर एक डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. जॅकलिन लवकरात लवकर आईला भेटण्यासाठी बहरीनला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून जॅकलिनचे कुटुंबीय बहरीनमध्ये राहत असून जॅकलिन ही एकटी मुंबईत राहते. जॅकलिनची आई किम यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर तातडीने बहरीन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टर जॅकलिनच्या आईवर उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आले आहे.

जॅकलिनने ईटाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कुटुंबीयांविषयी वक्तव्य केले होते. ‘माझे मित्रमैत्रीणी जे श्रीलंकेत राहतात आणि माझे कुटुंबीय जे बहरीनमध्ये राहतात ते भारताची परिस्थिती पाहून चिंता व्यक्त करत आहेत. मी बहरीनमध्ये रहावे असे माझ्या कुटुंबीयांना सारखे वाटत असते. तसेच माझे काका आणि चुलत बहीण-भाऊ देखील मला श्रीलंकेत परत येण्यास सांगत असतात’ असे जॅकलिन म्हणाली होती.

लवकरच जॅकलिन ‘राम सेतू’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. त्यानंतर ती ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. त्यापाठोपाठ तिचा ‘सर्कस’ हा चित्रपट देखील येणार आहे. या चित्रपटात ती अक्षय आणि क्रिती सेनॉन यांच्यासोबत दिसरणार आहे.