बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव सुकेश चंद्रशेखरशी जोडलं गेल्याने ती चांगलीच अडचणीत सापडली आहे. मध्यंतरी त्यांचे खासगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. २०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात जॅकलिनने चौकशीसाठी हजेरी लावली होती. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाबाबत तिची कसून चौकशी केली आहे.
जॅकलिनला दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावला. तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर जॅकलिन वकिलांसोबत दिल्ली पोलिसांसमोर हजर झाली. यापूर्वी २९ ऑगस्ट आणि १२ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला समन्स बजावला होता. पण दोन्ही वेळी ती चौकशीसाठी हजर राहू शकली नाही.
जॅकलिनबरोबर नोरा फतेही या अभिनेत्रीचीसुद्धा या सगळ्या प्रकरणाबाबत चौकशी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. चौकशीअंती पैशाच्या या अफरातफरीमध्ये या दोघी अभिनेत्री थेट सामील नसल्याचं समोर आलं आहे. पिंकव्हीलाच्या काही सूत्रांनुसार या घोटाळ्याचं केंद्रबिंदू असलेला सुकेश चंद्रशेखर याच्याशी जॅकलिन लग्नदेखील करणार होती असं स्पष्ट झालं आहे. सुकेशलाच आपला जोडीदार मानून जॅकलिन त्याच्याशी येत्या काही काळात लग्न करणार होती अशी चर्चा सध्या होत आहे.
जॅकलिन ही सुकेशच्या इतक्या प्रभावाखाली होती की त्याच्या गुन्ह्याविषयी समजल्यावरसुद्धा ती त्याच्या कायम संपर्कात होती. इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचे स्पेशल कमिशनर रवींद्र यादव यांनी एएनआयला स्पष्टीकरण देताना सांगितलं की, “सुकेश चंद्रशेखरच्या गुन्हेगारी वृत्तीविषयी समजूनही जॅकलिनने त्याच्याशी संबंध ठेवले यामुळेच तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. पण नोरा फतेहीने मात्र तसं न करता सुकेशशी संपर्क तातडीने तोडून टाकला होता.”
या चौकशीदरम्यान जॅकलिनच्या मॅनेजर प्रशांतकडून ८ लाखांची एक डुकाटी स्पोर्ट्स बाइक जप्त केली आहे. शिवाय ही मोटरसायकल सुकेशनेच प्रशांतला भेट म्हणून दिल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अभिनेत्री नोरा फतेही ही सुकेशला कधीच भेटली नव्हती पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा सुकेशशी संपर्क झाला. नोरालाही सुकेशने अशाच महागड्या भेटवस्तू देण्याचे कबूल केले होते, पण चौकशीदरम्यान आपण त्यापैकी कोणत्याही भेटवस्तू स्वीकारल्या नसल्याचं नोराने स्पष्ट केलं आहे.